महिला पर्यवेक्षिकेने केला पोषण आहारात अपहार

महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई ; मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रशासकीय कारवाई करण्याचे ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांचे निर्देश

ठाणे : अंगणवाडीतील बालकांना वाटप केला जाणारा सुका पोषण आहाराचे पॅकेट टेम्पोतून विक्रीसाठी घेऊन जाताना कल्याण तालुका एकात्मिक विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका ( सुपरवायझर ) सुषमा घुगे यांना निळजे हद्दीत सापळा रचून पकडण्यात आले. त्यांच्यावर मानपाडा पोलिस ठाण्यामध्ये भादवी कलम ४०९ आणि ४२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला. ५९ हजार ८१३ रकमेचा मुद्देमाल जप्त करत शनिवारी उशिरापर्यंत ही कारवाई करण्यात आली. संबधित पर्यवेक्षिकीवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत.
संबधित पर्यवेक्षिका अपहार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या आदेशांनुसार महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी उषा लांडगे, बालाजी कोरे यांच्या साथीने शनिवारी मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चौरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक डांबरे यांच्या पथकाच्या सहकार्यने सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी प्रशासनास सहकार्य केले.
पकडण्यात आलेल्या टेम्पोत मसूर, चणा, तेल, गहू, तांदूळ, मीठ, हळद, आदि पदार्थांची पाकिट होतीत. पकडण्यात आलेला मुद्देमाल हा ५९ हजार ८१३ रुपयांचा आहे. अंगणवाडी मार्फत सहावर्षाखालील बालक, स्तनदा माता, गरोदर माता यांना पूरक पोषण आहार वाटप केला जातो. कोव्हिडच्या काळात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून सुका पोषण आहार वाटप करण्यात येत होता.

दोषींवर तात्काळ कारवाई
घडलेल्या प्रकारात दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश मी दिलॆ आहेत. यापुढे देखील अशाप्रकारे गैरकाम करण्यावर कडक कारवाई केली जाईल असे ठाणे जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी सांगितले.

इतरांना देखील वचक बसेल
मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने कारवाई  करण्यात आली. या विभागाचा विभाग प्रमुख या नात्याने पुढील काळात असे गैरप्रकार रोखण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जाईल. दोषींवर कारवाई झालेली आहेच. या घटनेतून इतरांना देखील वचक बसेल असे महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले. 

 343 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.