नरवीर उमाजी राजे माहितीपट प्रदर्शित

इंग्रज सरकारने पाच कलमी कार्यक्रम जाहीर करून उमाजीला पकडण्यासाठी १५२ चौक्या बसवल्या होत्या.

कल्याण : ७ सप्टेंबर १७९१ रोजी जन्माला आलेल्या उमाजी नाईक यांनी रामोश्यांच्या उठावाचे नेतृत्व केले. इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. शिवरायांना श्रद्धास्थानी मानून उमाजींनी इंग्रजांचे राज्य धुडकावून लावले. इंग्रजांचे अत्याचारी राज्य उमाजी नाईक यांनी धुडकावून लावले. स्वतः स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रस्तुत केला. त्यामुळे इंग्रज सरकारने पाच कलमी कार्यक्रम जाहीर करून उमाजीला पकडण्यासाठी १५२ चौक्या बसवल्या. इंग्रजांच्या विरोधात रान पेटवणारे उमाजी राजे पहिले आद्यक्रांतिकारक होते.
त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला होती. हाच इतिहास जागवण्याच्या निमित्ताने उमाजी नाईक यांच्या २२९ व्या जयंती निमित्त लक्ष्मी चित्र च्या बॅनरखाली लेखक-दिग्दर्शक अजय पाटील यांनी तयार केलेल्या नरवीर उमाजी राजे या माहितीपटाचे ऑनलाइन उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर प्रदीप घोरपडे, कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा नेवगी, भिवंडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील,बीट विस्तार अधिकारी संजय असवले, केंद्रप्रमुख जयश्री सोरटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांनी उपस्थित राहून उमाजी राजे यांना अभिवादन केले. माहितीपटाला शुभेच्छा दिल्या. या माहितीपटात राजेंद्र पाटील, अनिता साळवे, गणेश भालेराव, करणसिंह राजपूत, मनीषा गामणे, अजय पाटील, अथर्व साळवे, श्रेयश पाटील यांनी भारदस्त आवाज दिला आहे.उत्तम माहितीपट तयार करुन उमाजी नाईक यांचा इतिहास जागवल्याबद्दल डॉक्टर घोरपडे यांनी सर्व कलाकारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या माहितीपटामुळे विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांची माहिती मिळेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत त्याबद्दल प्नेरणा नेवगी यांनी शिक्षकांचे कौतुक केले. स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा प्रसिद्ध करणारे राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करून नरवीर उमाजी या डाक्युमेंटरीला नीलम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
एका उपेक्षित क्रांतिकारकाचा जीवनप्रवास माहितीपटाद्वारे मांडल्याबद्दल संजय असवले यांनी शिक्षकांचे कौतुक केले. इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या उमाजी नाईकांचा इतिहास नरवीर या माहितीपटात द्वारे जनतेसमोर येत असल्याबद्दल जयश्री सोरटे यांनी कौतुक केले. यावेळी शिक्षकांनी उमाजी राजे यांना अभिवादन करून या माहितीपटाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील तर आभार मनीषा गामणे यांनी मानले.

 292 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.