जिल्ह्यातील आदिवासी शिक्षकांना वाटाण्याच्या अक्षता ?

आदर्श शिक्षक पुरस्कारात डावलल्याची भावना

शहापूर ( शामकांत पतंगराव ) : शिक्षकांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या गुणांचा सन्मान व्हावा या उद्देशाने शिक्षक दिनी देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा पासून जिल्हापरिषद शाळांमधील आदीवासी शिक्षक गेल्या १५ ते २० वर्षांपासून उपेक्षित राहिले आहेत. ठाणे जिल्हापरिषदेकडून जाणीवपूर्वक आदिवासी शिक्षकांना डावलण्यात येत असल्याने तालुक्यातील आदिवासी शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत न्याय मिळावा यासाठी अनेक आदिवासी संघटना एकवटल्या असून त्यांनी तालुका व जिल्हाप्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
शहापूर तालुक्यात जिल्हापरिषदेच्या ४५७ शाळा असून आदिवासी शिक्षकांसह एक हजार २४६ शिक्षक कार्यरत आहेत. आदिवासी बहुल असलेल्या शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागात जिल्हापरिषदेच्या बहुतांशी शाळा वसलेल्या असून खडतर प्रवास करून इतर शिक्षकांसह आदिवासी शिक्षक देखील ज्ञानदानाचे काम करीत आहेत. असे असताना दरवर्षी पाच सप्टेंबर ला शिक्षकदिनी देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारापासून तालुक्यातील आदिवासी शिक्षक उपेक्षित राहिला आहे. गेल्या १५ – २० वर्षांपासून शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागासह ठाणे जिल्हापरिषदेने या शिक्षकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या शिक्षकांमधून नाराजीचे सूर उमटले जात आहेत. जिल्हा व तालुका प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे ज्ञानदानाचे काम करणाऱ्या आदिवासी शिक्षकांच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुका प्रशासनाचे उदासीन धोरण आणि जिल्हाप्रशासनाने जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष यामुळे आदिवासी शिक्षकांवर पुरस्कारासंदर्भात अन्याय होत असल्याचा आरोप आदिवासी संघटनांकडून केला जात आहे. शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाची नोंद वेळोवेळी करून शिक्षकांमधील आदर्श गुणांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे अशा भावना विविध आदिवासी संघटनांकडून व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, पुरस्कारासंदर्भात आदिवासी शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी सह्याद्री आदिवासी म ठाकूर समाज उन्नती मंडळ, आदिवासी कोकणा समाज, आदिवासी कोळी महादेव एकता प्रतिष्ठान, आदिवासी महादेव कोळी समाज आदी आदिवासी संघटनांकडून केली जात असून या संघटनांनी तालुका व जिल्हा प्रशासनाचे याबाबत लक्ष वेधले आहे.

 461 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.