माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या दौऱ्याने शिवसेनेत उत्साह

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला फायदा होण्याची वर्तवली जातेय शक्यता

शहापुर (शामकांत पतंगराव) : विधानसभेच्या निवडणुकीत अनपेक्षित झालेला पराभव विसरून माजी आमदार पांडुरंग बरोरा हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहापूर विधानसभा मतदारसंघात फिरून जुनी मित्रमंडळी व शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत असल्याने ग्रामीण भागातील शिवसेनेत उत्साह संचारला आहे
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यसम्राट आमदार पांडुरंग बरोरा यांना गळ लावून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला.अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बरोरा यांचा शिवसेना भवनात प्रवेश झाला.चक्क एका विद्यमान आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उमटले.अनेकांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपापल्या सोयीच्या पक्षात प्रवेश केला.
खऱ्या अर्थाने विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल तेव्हाच शहापुरातुनच वाजले होते. शहापूर विधानसभा मतदारसंघात
शिवसेना प्रचारात आघाडीवर होती.पालकमंत्र्यानी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला व बरोरा यांच्यासाठी पोषक वातावरण तयार झाले.
आमदारकीच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पांडुरंग बरोरा प्रचारात अग्रेसर राहिले.
दरम्यान शिवसेनेचा मवाळ चेहरा असलेल्या दौलत दरोडा यांना तिकीट देण्यात डावलल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही गळ लावून सेनेला धोबीपछाड दिली…….आणि इथेच खरी जंग सुरू झाली.दरोडांवर शिवसेनेने अन्याय केला असा त्यांचाच समर्थकांनी पद्धतशीर प्रचार केल्याने त्यांना सहानुभूती मिळतच राहिली.काही शिवसैनिक दरोडा यांच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व भगवे झेंडे घेऊन खुलेआम सक्रिय झाले होते.हा प्रकार बघून चवताळलेल्या शिवसेनेच्या तालुका श्रेष्ठींनी बंडखोर पदाधिकारी, शिवसैनिक यांची हकालपट्टी केली आणि मग सुडभावनेने पेटून उठलेला नाराज शिवसैनिक मात्र दरोडांच्या प्रचारात रमला. अन्याय झालाय म्हणून दौलत दरोडा यांना मिळालेली सहानभूती, हकालपट्टी झालेले काही शिवसैनिक, कोणाच्या अध्यायात ना मध्यात असलेले काही शिवसैनिक व्यक्तिशः प्रचारात सक्रिय झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीसोबात काम केल्याने दरोडांचा विजय नक्की झाला पण शिवसेनेचा उमेदवार पडला.
शिवसेनेचे नुकसान झाले त्यापेक्षा पांडुरंग बरोरा यांची राजकीय हानीच अधिक झाली.शिवसेनेच्या जिल्हा जेष्ठ नेत्यांनी वारंवार घेतलेली हम करे सो भूमिका शिवसैनिकांना पटली नव्हती,याचा व्हायचा तो विपरित परिणाम झालाच.
राष्ट्रीवादीतून शिवसेनेत आलेल्या बरोरा यांना अनपेक्षित निकालाला सामोरे जावे लागले त्यामुळे शिवसेनेत मरगळ आली असतानाच व आपला पराभव विसरून गणेशोत्सवाच्या निमित्ताने पांडुरंग बरोरा हे शहापूर विधानसभा मतदार संघाच्या त्या त्या विभागातील स्थानिक पदाधिकारी सोबत घेऊन पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत आहेत.
सक्रिय नसलेले अनेक शिवसैनिक, विद्यमान पदाधिकारी, शिवसैनिक व काही जेष्ठ शिवसैनिक की जे आता पक्षकार्य प्रक्रियेतून बाद झाले आहेत अशांचा भेटी घेत आहेत.या मुळे शिवसैनिकांच्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे,याचा फायदा आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये नक्कीच होईल

 731 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.