चुकीच्या औषधांमुळे हृदयविकार वाढण्याची शक्यता

लॉकडाउनमध्ये वाढलेले वजन कमी करण्यावर नागरिकांचा भर
मुंबई : देशभरात कोरोना व्हायरस विषाणूंची लागण झालेल्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाउन लागू केला होता त्यामुळे अनेक नागरिक आपल्या राहत्या घरामध्ये अडकून पडले होते. मोकळ्या हवेतील  मॉर्निंग वॉक करण्यावर तसेच जिममध्ये जाण्यावर बंधने आली होती; जून महिन्यापासून थोडेफार निर्बंध हटविल्यानंतर जीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असली तरीहि कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिक आजही घरात अडकून आहेत. काम नसताना घराबाहेर न जाण्याचे आवाहन सरकारतर्फे केले जात आहे व त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. लॉकडाउनच्या काळात जीवनशैली आणि कार्यपद्धतीत बदल झाले आहेत. दिवसभर लॅपटॉप समोर बसून काम किंवा तासनतास टीव्ही पाहण्यामुळे डोळे, मान, खांदे, पाठ, कंबर आणि पाय दुखण्याच्या समस्येनं डोकं वर काढल्याचं अनेक जण तक्रार करत आहेत. जसे एके ठिकाणी बसून राहिल्यामुळे त्यांना  वाढलेल्या वजनाची चिंता सतावू लागली आहे. वाढलेल्या वजनाच्या चिंतेमुळे अनेक नागरिकांचा ऑनलाइन  म्हणजेच इंटरनेटवर असलेल्या माहितीद्वारे वजन कमी करण्याकडे कल वाढू लागला आहे व ते आरोग्याच्या दृष्टीने खूपच धोकादायक आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये घरच्या घरी वजन कमी कसे करावे, अल्प दरात वजन कमी करण्याच्या गोळ्या व औषधे कशी लाभदायक आहेत, आहारात बदल कसा करावा, प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी कोणती औषधे घ्यावी  या विषयांवर अनेक व्हिडीओ  सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत परंतु याला कोणताही वैद्यकीय अथवा शास्त्रीय आधार नाही त्यामुळे वजन कमी करण्याच्या नादामध्ये अनेक नागरिकांना घरी करीत असलेल्या उपायांचे साईड इफेक्ट जाणवू लागले आहेत. याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले , “गेल्या सहा महिन्यात अनेक नागरिक घराबाहेर न पडल्यामुळे वजन वाढल्याच्या तक्रारी करीत आहेत परंतु फक्त घरी राहिल्यामुळे  हे वजन वाढले हीच संकल्पना चुकीची आहे. कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये वजन वाढण्यामागे आपल्या रोजच्या आहारातील बदललेल्या सवयी, कोरोनापासून  बचाव करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत असलेली औषधे, लॉकडाउनमुळे नोकरी धंद्यामध्ये आलेले अपयश, मुलांच्या शिक्षणाचे पुढे काय होणार याची चिंता, कुटुंबातील व्यक्तीसोबत वादविवाद, नात्यामधील दुरावा, अनुवंशिकतेमुळे होणारे आजार व एकूणच कोरोनामुळे आलेली अनिश्चितता अशी अनेक कारणे आहेत.  
कोरोनाच्या दहशतीमुळे शहरातील नागरिकांना शारीरिक व मानसिक आजारांनी घेरले आहे; त्यामुळे कोणतेही उपचार करण्यापूर्वी आपल्या शरीरात काय बदल झाले आहेत हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. रक्तदाब, मधुमेह व इतर वैद्यकीय तपासणी करून वाढलेल्या वजनावर औषध घेणे हितकारक ठरेल. अनेक नागरिक इंटरनेटवर असलेल्या जाहिराती पाहून कमी कालावधीत  वजन कमी करण्याची औषधे घेतात व विनाकारण शारीरिक हानी करून घेतात. अनेक वेळा या औषधांमुळे हृदयविकार व पक्षाघातासारखे आजार होण्याची शक्यता वाढते”. 
कोरोना संक्रमण काळात अनेक नागरिकांची आहार शैली बदलली असून इन्स्टंट किंवा पॅकींग केलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, जंकफुड, कोल्डड्रींक्स, मद्यपान व धुम्रपानामध्ये सुद्धा वाढ झाली आहे असे निरिक्षण एका अहवालात दिसून आले होते.
 डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाचा अगदी अपेक्षित दुष्परिणाम म्हणजे रक्तशर्करा सामान्य पातळीपेक्षाही कमी होऊन हायपोग्लायसेमिया होतो व त्यामुळे अगदी शुद्धही हरपू शकते, म्हणूनच  नेमकी कोणती औषधे आपण घेत आहोत याची कल्पना उपचार करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांना देणे जरूरीचे असते. कोरोना संक्रमण काळामध्ये आपल्या आरोग्याची  सध्यस्थिती काय आहे, याची माहिती प्रत्येकाने ठेवणं गरजेचं असतं; यासाठी रक्तशर्करेची पातळी, रक्तदाब नियमितपणे तपासून घ्यायला हवा तसेच हृदयविकार टाळण्यासाठी नियमित लिपिड प्रोफाइल, रक्तशर्करा तपासण्या करणं गरजेचं आहे अशी माहिती हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी दिली.

 467 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.