शरद पवार यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

मुंबई : सिल्वर ओकवरील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवार सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. पवारांचा स्टाफ ज्या ठिकाणी राहतो, तिथेही चाचणी करत आहोत. त्यांची काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलनुसार सगळ्या गोष्टी पाळल्या जात आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.
शरद पवार सातत्याने राज्यभर दौरा करत आहेत. मात्र सध्या राज्यात न फिरण्याची विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. “शरद पवार महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. काळजी घ्यावी असं आम्ही कायमच सांगत असतो. परंतु त्यांचा उत्साह, लोकांप्रति बांधिलकी किंवा दौऱ्यातून कदाचित संदेश द्यायचे असतात. ते स्वत:ही काळजी घेत आहेत, चिंता करण्याची काही गोष्ट नाही,” असं राजेश टोपे म्हणाले.

 404 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.