भाजपाची पुन्हा राज्यपालांकडे धाव…. बिहारसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधात तक्रार

यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याऐवजी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे होते नेतृत्व

मुंबई : धार्मिक स्थळे त्वरित उघडा, गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्वरित दिलासा द्या, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दल भाजपाच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा राजभवनावर जात राज्य सरकारच्या विरोधात तक्रार केली. मात्र भाजपाच्या या शिष्टमंडळात यंदा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नव्हते. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ गेले होते. या शिष्टमंडळात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विजय भाई गिरकर, योगेश सागर, कालिदास कोळंबकर, सुनील राणे, मानिषाताई चौधरी, राहुल नार्वेकर, मिहीर कोटेचा, पराग शाह यांचा समावेश होता.
राज्यातील सर्व धार्मिक स्थळे तातडीने उघडण्याची मागणी करत बुधवारी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन प्रसंगी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली असावीत असा आग्रह या शिष्टमंडळाने धरला. भाजपच्या या मागणीवर राज्यपाल महोदयांनी मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून चर्चा करून या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना होत असलेल्या प्रशासनिक जाचाबद्दलही राज्यपालांकडे तक्रार केली. ई-पास बाबत असलेले घोळ, गावी क्वारंटाईन होण्याची सक्ती, कोकणातील वैद्यकीय सुविधांची दुरवस्था, प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीची अनुपलब्धता अशा अनेक बाबतीत राज्यपालांना अवगत करण्यात आले.
भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारकडून बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दलही तक्रार केली. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने कुणालाही न वाचवता या प्रकरणातील मुख्य गुन्हेगारांना पकडण्यास मदत केली पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.

54 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *