‘तृणपुष्प’च्या ५७५ रहिवाशांवर बेघर होण्याची आली पाळी

मागील १० वर्षांपासून घरांपासून वंचित.विकासकाकडून घरभाडे मिळत नसल्याने आली ही वेळ

रहिवासीयांनी घेतली आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव

ठाणे : येथिल पाचपाखाडी भागातील सुमारे ५७५ गरीब रहिवासी गेल्या १० वर्षांपासून मालकी हक्काच्या घरांपासून वंचित असून विकासकाने घरभाडे थकवल्याने झोपडीधारकांवर बेघर होण्याची पाळी आली आहे. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली असून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
ठाण्याच्या पाचपाखाडी येथील तृणपुष्प सहकारी गृहनिर्माण संस्था १९७७ मध्ये स्थापन झाली. संबंधित भूखंड क्रमांक ३१५ हा महाराष्ट्र सरकारच्या मालकीचा आहे. संस्थेचे अध्यक्ष कृष्णकांत डोंगरे आणि सचिव रतन बोरीचा हे आहेत. या ठिकाणी ५७५ हून अधिक कुटुंबे वास्तव्य करीत होती. त्यात बहुतांशी रिक्षाचालक, सुरक्षारक्षक यांच्यासह हातावर पोट असलेल्या मजुरांचा समावेश आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी पुष्पक डेव्हलपर्सतर्फे झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन, तत्कालीन झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये (एसआरडी) आरखडा सादर करण्यात आला होता. त्यास ठाणे महापालिकेने १ जुलै २०१० रोजी मंजुरी दिली.
गेल्या दहा वर्षांत इमारतीचे बांधकाम वेगाने होऊन रहिवासी घरात स्थिरस्थावर होण्याची अपेक्षा होती. मात्र, पुष्पक डेव्हलपर्सच्या दिरंगाई आणि दुर्लक्षामुळे दहा वर्षांनंतरही इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. हक्काच्या घरात जाण्याची गरीब रहिवाशांची स्वप्ने धुळीला मिळाली आहेत. पुष्पक डेव्हलपर्सने तेव्हापासून या रहिवाशांना घरभाडे देण्यास सुरुवात केली खरी पण आजतागायत ते हक्काच्या घरांपासून वंचित आहेत, 
`कोरोना’मुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर, गेल्या चार महिन्यांच्या काळात विकासकाकडून रहिवाशांना घरभाडेही नाकारण्यात आले. या संदर्भात बिल्डर कंपनीच्या कार्यालयात वा संचालक, कर्मचाऱ्यांकडे वेळोवेळी दूरध्वनी केला असता टाळाटाळ करण्यात आली. घरभाडे दिले जात नाही आणि कामही पूर्ण केले जात नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता आहे. या रहिवाशांकडून तीव्र आंदोलनाची तयारी केली जात आहे. 
या प्रकरणी त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. संबंधित प्रकल्प राबवण्याची कंपनीची इच्छा नसल्यास, दुसऱ्या कंपनीकडे प्रकल्प वर्ग करावा. अन्यथा, स्वत: पुढाकार घेऊन झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने हा प्रकल्प ताब्यात घेऊन पूर्ण करावा, अशी मागणीही केळकर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
ठाण्यात अनेक झोपड्पट्टी पुनर्विकास प्रकल्प रखडले असून हजारो गरीब रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित राहिले आहेत. या रहिवाशांच्या पाठीशी राहून आंदोलन उभारणार  असल्याचे  केळकर यांनी सांगितले. कोपरी येथील समन्वय आणि मित्रधाम या दोन सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील शेकडो गरीब रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असता मी तत्काळ संबंधित अधिकारीवर्गाशी संपर्क साधून आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित विकसकाला तातडीने नोटिसही बजावण्यात आली आहे. या संस्थांप्रमाणेच पाचपाखाडी येथील ‘तृणपुष्प’च्या रहिवाशांच्या पाठीशी उभे राहणार आहे. त्यांना हक्काचे घर मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही  असेही केळकर यांनी सांगितले.

 379 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.