वयाच्या ९२ व्या वर्षी वार्धक्यामुळे घेतला शेवटचा श्वास
मुंबई : माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आज सकाळी ८.३० वाजता वार्धक्यामुळे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं असा परिवार आहे.
माजी केंद्रीय गृहसचिव होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतरच्या काळात ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिले. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ते अरूणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. याशिवाय आसाम आणि मिझोरम राज्यात शांतता स्थापित करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. निवृत्तीनंतर ते महाराष्ट्र सरकारकडून अनेक वादग्रस्त समित्यांची स्थापना करून त्यांच्या सूचना स्विकारल्या होत्या. २६-११ च्या हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. याशिवाय महाराष्ट्रातील पाणी प्रश्नी, विकास आदी प्रश्नांवरही त्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमण्यात आलेल्या होत्या. तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचे त्यांनी ट्रस्टी म्हणून काम पाहिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला राम प्रधान यांच्या आठवणींना उजाळा
राम प्रधान यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुध्दिमान व व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत राम प्रधान यांनी गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
विलक्षण बुद्धिमत्ता, कार्यतत्परता आणि सचोटी या गुणांमुळे राम प्रधान प्रशासकीय क्षेत्रात अग्रभागी होते. विवादास्पद परिस्थितीत तोडगा काढण्यात, सामंजस्य घडवून आणण्यात प्रधान यांचा हातखंडा होता. ऑपरेशन ब्ल्यु स्टार पश्चात पंजाब समस्या अतिशय संयमाने, संवेदनशीलतेने आणि अभ्यासपूर्वक हाताळण्याचे मोठेच कार्य राम प्रधान यांनी केले. अकाली दलाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी माझे योगदान घ्यावे म्हणून राम प्रधान यांनीच राजीव गांधींना गळ घातली होती. त्यावेळी मी राज्यात विरोधी बाकावर होतो. परंतु राजीव गांधींनी प्रधानांचा हा सल्ला मानला. प्रधानांची मुत्सद्देगिरी आणि राजीवजींची परिपक्वता याचा परिपाक असा की, पंजाब शांतता कराराची बोलणी करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. कालांतराने सर्वांच्या प्रयत्नाने पंजाब शांतता करार झाला. याचे श्रेय निश्चित राम प्रधानांना जाते ही आठवणही शरद पवार यांनी सांगितली. यशवंतराव चव्हाण सेंटर तसेच नेहरू सेंटर या संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी आमच्यासोबत महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि रचनात्मक विधायक कार्यक्रमांना त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची जोड देत सामाजिक बांधिलकी जपल्याचे त्यांनी सांगितले.
509 total views, 1 views today