रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या १९ बिलांमध्ये ९ लाख ३६ हजार ६१८ रुपये जादा आकारणे, त्याचप्रमाणे कोविडसाठी लागणाऱ्या इंजेक्शनसाठी एम.आर.पी.पेक्षा जास्त दर आकारणे इत्यादी अनियमितता आढळून आल्या.
कल्याण : कोरोना काळात रुग्णांची अव्वाच्या सव्वा बिल आकारून लुटमार करणाऱ्या कल्याण मधील ए. ॲण्ड जी. या रुग्णालयाची मान्यता पालिका प्रशासनाने रद्द केली आहे.
शासनाने निर्धारीत केलेल्या दरानेच दराची आकारणी कोव्हिडचा दर्जा दिलेल्या खाजगी रुग्णालयांनी करण्याबाबत महापालिकेने निर्देश देवूनही, महापालिकेने कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केलेल्या कल्याण पश्चिम येथील मे. ए. ॲण्ड जी. हॉस्पिटल रुग्णांकडून जास्त बिल आकारत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथकाने सदर रुग्णालयाची गैरवाजवी बिलांबाबत चौकशी केली असता, सदर रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या १९ बिलांमध्ये ९ लाख ३६ हजार ६१८ रुपये जादा आकारणे, त्याचप्रमाणे कोविडसाठी लागणाऱ्या इंजेक्शनसाठी एम.आर.पी.पेक्षा जास्त दर आकारणे इत्यादी अनियमितता आढळून आल्या.
याबाबत चौकशी अंती या रुग्णालयाला महापालिकेने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसीला रुग्णालयाने मुदतीत उत्तर दिले नाही तसेच पाठपुरावा केल्यानंतरही रुग्णालयाने दिलेला खुलासा समर्पक नसल्याचे दिसून आले. रुग्णालयात केलेल्या चौकशी अंती गंभीर अनियमितता आढळून आल्याने कल्याण डोंबिवली शहरातील सर्वसामान्य कोव्हिड रुग्णांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रशासनाला आढळून आले.
त्यामुळे मे. ए.ॲण्ड जी. हॉस्पिटल, सुचक हाऊस, कल्याण पश्चिम यांस कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आदेश महापालिकेने रद्द केले आहे. सदर रुग्णालयाची क.डो.म.पा. कल्याण द्वारे मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९ नुसार देण्यात आलेली रुग्णालय नोंदणी ३१ ऑगस्ट २०२० किंवा उपरोक्त अनियमितता दूर करुन रुग्णांस रक्कम परत करणे यापैकी जे नंतर घडेल तोपर्यंत निलंबित करण्यात आली आहे.
484 total views, 1 views today