दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत ४०० युनिट रक्त संकलित
कल्याण : मानवतेच्या सेवेसाठी कटिबद्ध निरंकारी भक्तगण कोरोनाच्या संकटकाळात दैनंदिन तत्वावर रक्तदान करत असून या रक्तदान अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात दिनांक १५ जून ते २६ जुलै या कालावधीत आतापर्यंत त्यांनी ४०० युनिट रक्तदान करुन मोलाचे योगदान दिले आहे. या अभियाना अंतर्गत विलेपार्ले, मुंबई येथील संत निरंकारी रक्तपेढीमध्ये रविवार,२६ जुलै रोजी ५४ निरंकारी भक्तांनी रक्तदान केले असून हे अभियान यापुढेही असेच चालू राहणार आहे.
संत निरंकारी मिशनच्या वर्तमान प्रमुख, सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या केवळ एका निर्देशावर निरंकारी भक्तगण कोणत्याही प्रकारच्या मानवतेच्या सेवेमध्ये स्वत:ला झोकून देत असतात, असा त्यांचा समर्पण भाव आहे. सद्गुरुच्या शिकवणूकीनुसार मानवतेच्या सेवेची भावना त्यांच्या मनामध्ये ठासून भरलेली आहे.
लॉकडाऊनमुळे प्रवासाच्या साधनांचा अभाव लक्षात घेऊन मुंबई परिक्षेत्रातील रक्तदान करु इच्छिणाऱ्या भक्तांना रक्तपेढीपर्यंत घेऊन येणे व परत त्यांच्या गन्तव्य स्थानावर नेऊन पोचवण्याचे कार्य मिशनच्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मिशनचे मुंबई परिक्षेत्र पश्चिम मार्गावर कुलाबा ते भाईंदर, मध्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते नवी मुंबई, पनवेल व उरणपर्यंत २३ सेक्टर्समध्ये विखुरलेले आहे.
कोविड-१९ च्या संकटकालीन परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे अवघड झाल्यामुळे सद्यस्थितीत संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले येथेच हे रक्तदान करण्यात येत आहे. प्रत्येक सेक्टरला निश्चित तारखा देण्यात आल्या असून त्यानुसार नियोजनबद्धरित्या आणि कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत हे रक्तदान अभियान चालविण्यात येत आहे. या रक्तदान अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मे महिन्यामध्ये ३७९ युनिट रक्त संकलित करण्यात आले होते.
527 total views, 2 views today