लॉकडाऊन वाढवल्यास ठाणे भाजपा आंदोलन करणार

निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदन

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या मुदतवाढीला भाजपाने तीव्र विरोध केला आहे. लॉकडाऊनबाबत जनतेत आक्रोश असून, यापुढे लॉकडाऊन वाढविल्यास भाजपाकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा ठाणे भाजपाने महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. यासंदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात आमदार संजय केळकर, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक भरत चव्हाण आदींचा समावेश होता.
कोविड-१९ च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रात २ जुलैपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर त्याला १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, लॉकडाऊनच्या काळातही कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली, याकडे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे भाजपाकडून लक्ष वेधण्यात आले.
मुंबईमधील काही भागात सम-विषम नियमानुसार दुकाने व मर्यादित कर्मचाऱ्यांच्या साह्याने कार्यालये सुरू आहेत. त्यामुळे मुंबईत ठाणेकरांची ये-जा सुरू आहे. मात्र, ठाणेकरांचे उपजिविकेसाठी आवश्यक व्यवहारही ठप्प झाले आहेत. त्यामुळे याबाबत जनतेत आक्रोश आहे. लॉकडाऊन हे एक माध्यम आहे. मात्र, त्यामुळे कोरोनाला आळा बसलेला नाही. यापुढे लॉकडाऊन वाढविल्याची भूमिका घेतल्यास भाजपाकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांनी दिला. त्याचबरोबर कोविड संसर्ग रोखण्याच्या भविष्यातील उपाययोजनांबाबत भूमिका स्पष्ट करण्याची विनंतीही केली.

 355 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.