सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सुविधा द्या

कोरोनाच्या वाढत्या साहित्यिक-कलाकारांचे आयुक्तांना पत्र

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरांमध्ये कोरोनाग्रस्त आणि करोनाने आयुष्य गमावणा-याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. प्रतिदिन सरासरी रूग्णसंख्या सहाशे पार झालेली आहे. महापालिका आणि डॉक्टर्स या कार्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मात्र खासगी रूग्णालयाच्या सुलतानी कारभारांवर, अरेरावीवर आणि लूटालूटीवर नियंत्रण आवश्यक आहे. कोरोनाकडे कमाईची संधी नव्हे तर मानवतेच्या सेवेची संधी म्हणून पाहण्याची गरज असून नागरिकांचा होणारा मानसिक छळ त्वरीत थांबवून सर्वसामन्यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याची मागणी कल्याणातील साहित्यिक आणि कलाकारांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.
शासकीय यंत्रणा आणि महापालिकेचे सध्याचे इन्फ्रास्ट्रक्चर हे संकट थोपवण्यास अपुरे आहे याची नागरिकांना जाणीव आहे. इथल्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कल्याण-डोंबिवलीत सुसज्ज सरकारी हाॕस्पिटल नाही हे वास्तव असून त्यामुळेच खासगी रूग्णालयांची मदत घेण्यात येणं हे स्वाभाविक आहे. मात्र खासगी रूग्णालयांकडून दोन-अडीच लाखांचा बयाणा मागणं, नंतरच उपचार सुरू करणं, रात्रीबेरात्री सावकारासारखी पैशाची मागणी करणं, औषधं इंजेक्शन्स न मिळणं, तुटवडा दाखवणं हे सारं रोगापेक्षा भयंकर असून एकप्रकारे मानसिक छळ असल्याचे या साहित्यिक आणि कलाकारांनी पत्रात नमूद केले आहे.
 महापालिका आणि शासनाने कोरोना उपचाराचे स्टँडर्ड निश्चित करणं आवश्यक आहे. प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना लाॕकडाऊन वाढवण्याचे वा शिथील करण्याचे अधिकार आहेत. त्याचप्रमाणे उपचारात पारदर्शकता आणणेही त्यांच्याकडून अपेक्षित आहे. या जागतिक महामारीच्या संकटात किमान सर्वसामान्यांना परवडणारे उपचार असावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
यामध्ये कल्याणातील सार्वजनिक वाचनालय, राम गणेश गडकरी कट्टा, कोकण इतिहास परिषद, नाट्य परिषद, वृत्तपत्र लेखक संघ, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक संघ, संकल्प प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, सामाजिक कार्यकर्ते, निरुपणकार, कवी, लेखक, गृहिणी आदी ५० हुन अधिक जणांचा सहभाग आहे.

 388 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.