भाजपा शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांचे नागरिकांना आवाहन
अंबरनाथ : जोपर्यंत वीज बिलांमध्ये दुरुस्ती करून आपण नवीन बिल पाठवत नाहीत, तोपर्यंत नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची वीजबिल वसुली करू नये अथवा वीज पुरवठा खंडित करू नये, अन्यथा भाजपातर्फे महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी दिला आहे. नवीन बिले येत नाहीत तोपर्यंत नागरिकांची बिले भरू नये असे आवाहनही अभिजित करंजुले यांनी केले.
कोरोनाचे संकट आपल्या देशात वाढत गेल्यामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. महावितरणकडून रिडींग घेणारे कर्मचारी कोरोनाच्या संकटामुळे रिडींग घ्यावयास आले नाहीत. त्यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये विजेची बिले अंदाजित स्वरूपात पाठविलेली आहेत. अंबरनाथ शहरातील नागरिक प्रामाणिक असल्यामुळे महावितरणकडून पाठविलेली अंदाजित बिले सुद्धा ते भरत आहेत. वीज कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणे वगळता प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतलेले आहे व मागील रिडींग आणि चालू रिडींग युनिट एकदम एकत्रित करून अंबरनाथ मधील नागरिकांना बिले पाठविण्यात आलेली आहेत, त्यामुळे ही तीन महिन्याची रिडींग एकत्रित होऊन नागरिकांच्या बिलात मोठ्या स्वरूपात बिलाची रक्कम आकारण्यात आलेली आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दोन-तीन महिने रिडींग न घेतल्यामुळे हा प्रकार झालेला असल्याचे भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश सत्यनारायण कलंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.
नागरिकांना चुकीची बिले पाठवून जनतेला फसवून बळजबरीने बिले वसूली करण्यात येत आहेत. त्यात त्वरित सुधार करण्यात यावा. कोरोना संकटामुळे केंद्र सरकार सर्वतोपरीने मदत करत असताना महावितरणकडून युनिट रेट वाढवून, चुकीची बिले पाठवून जनतेला वेठीस धरण्यात येत आहे. आपणही ह्या कठीण समयी जनतेला त्रास न देता किमान ३०० युनिटपर्यंत प्रतिमाह वीज बिल आकारणी करू नये. एकत्रित पाठविलेल्या बिलाची युनिट तीन हफ्त्यात समानरीतीने विभागूनच नागरिकांना बिले पाठविण्यात यावीत, अशीही मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.
जोपर्यंत वीज बिलांमध्ये दुरुस्ती करून आपण नवीन बिल पाठवत नाहीत, तोपर्यंत नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची वीजबिल वसुली करू नये अथवा वीज पुरवठा खंडित करू नये, अन्यथा भाजपातर्फे महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी दिला आहे.
अभिजित करंजुले यांनी अभियंत्यांना निवेदन दिले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे, दिलीप कणसे, मनीष गुंजाळ, नितीन परब, विश्वास निंबाळकर, महेश मोरे, राहुल भोसले आदि पदाधिकारी उपस्थित होते.
524 total views, 1 views today