राज्यभरात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात बस सेवा उपलब्ध करा

मनसे आमदार राजू पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

कल्याण : कोकणासह राज्यभरात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात बस सेवा उपलब्ध देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी परिवहन मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे .
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनला आता चार महिने होत आले असून अजूनही वाढविण्यात येत आहे. या कालावधीत मुंबई, ठाणे,पुण्यासह राज्यभरात राहणाऱ्या चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे अथवा राज्य शासनाची परिवहन सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली नसल्याने याचा गैरफायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्स कडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून सर्वसामान्यांची लूटमार सुरू असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे .याबाबत त्यांनी परिवहन मंत्र्यांना पत्र पाठवून कोकणात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो व राज्यातील कानाकोपऱ्यात नोकरी, व्यवसायानिमित्त रहात असलेला चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जुन कोकणात जातो. दरवर्षी रेल्वे व बस सेवेसारखी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असल्याने त्याला जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नव्हती. यावर्षी सध्याची परिस्थिती पाहता रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता वाटत नाही. अशा वेळी राज्यांतर्गत परिवहन सेवाही सुरू न झाल्यास अडचणी अधिक वाढणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊनमुळे नोकऱ्या, व्यवसाय बंद असल्याने सर्व सामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच गावी जाण्यासाठी केवळ खाजगी वाहतुकीचा पर्याय राहिल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड चाकरमान्यांना पडणार असून सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये परवडणारा नाही. वास्तविक राज्यातील जनतेने लॉकडाऊन काळात गेले चार महिने संयम राखून कोरोनाच्या लढ्यात शासनाला सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. त्यामुळे कोकणासह राज्यात गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन मंडळाची बस सेवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी, शक्य असल्यास केंद्राकडे कोकणासाठी खास रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी करावी. तसेच कोरोनाबाबत अधिक काळजी घेण्यासाठी प्रवास करणाऱ्या सर्व चाकरमान्यांची मोफत मेडिकल चाचणी घेऊन सर्वांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे अशी मागनी परिवहनमंत्र्यांकडे केली आहे

 491 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.