केडीएमसीने कोरोना रॅपिड टेस्ट स्वखर्चाने त्वरित करावी

भाजप गटनेते शैलेश धात्रक यांची मागणी, पुणे महानगरपालिकेचे दिले उदाहरण
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचबरोबर या आजारामुळे अनेक लोकांचे मृत्यू पावले महानगरपालिकेच्या वतीने कोरोना संबंधी टेस्ट घेण्यात येते. परंतु सदर टेस्टचा रिपोर्ट मिळण्यासाठी साधारणत: दोन ते तीन दिवस हा फार मोठा कालावधी लागत आहे. या दरम्यान संक्रमित झालेल्या रुग्णाची परिस्थिती आणखीनच जास्त बिघडत असते व त्यांच्यावर उपचार करणे कठीण जात असते. परिणामी काही लोकांचा यामुळे मृत्यू देखील झाला असेल.
सदरची गंभीर बाब टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिका राबवित असलेली रॅपिड टेस्टच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सुरू करण्यात यावी अशी मागणी भाजप गटनेते शैलेश धात्रक यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली.
पुणे महापालिकेतील रॅपिड टेस्टची किंमत ४०० रुपये आहे. महत्त्वाचं म्हणजे या रॅपिड टेस्टचा रिपोर्ट फक्त अर्ध्या तासातच मिळतो. त्यामुळे रुग्ण आणि आरोग्य अधिकारी या दोघांनाही पुरेसा वेळ मिळतो. या रॅपिड टेस्टचा प्रशासन आणि नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. अर्थातच अनेक नागरिक टेस्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. यामुळे भविष्यात आपोआपच या आजारावर महापालिका प्रशासनाला नियंत्रण मिळू शकणार आहे.
अशा पद्धतीचे काम जर आपल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सुरू झाले तर महानगरपालिकेतील नागरिकांना दिलासा मिळेल व कोरोना पासून संक्रमित होणाऱ्या व केवळ अर्ध्या तासात रिपोर्ट मिळाल्यामुळे अनेक नागरिकांचा जीव देखील वाचू शकेल. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त किंवा संबंधित अधिकाऱ्यांची समन्वय साधून पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात नागरिकांची कोरोना विषयक तपासणी करण्यात येणारी रॅपिड टेस्ट कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांसाठी त्वरित सुरू करण्यात यावी. सदर रॅपिड टेस्ट साठी लागणारा सर्व खर्च देखील महानगरपालिकेच्या वतीने करण्यात यावा आणि या महामारी मध्ये आर्थिक दृष्ट्या हतबल झालेल्या समस्त नागरिकांना आरोग्य विषयक संरक्षण आणि दिलासा द्यावा अशी विनंतीहि धात्रक यांनी केली आहे.

 558 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.