५ कोटी ग्रामीण जनतेस अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषध मोफत

औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदांना – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील सुमारे ५ कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त औषधे तात्काळ आवश्यक त्याप्रमाणे कमीत-कमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. आयुष मंत्रालयाच्या सूचनेस अनुसरून आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे मोफत औषध जनतेला तत्परतेने पुरवावे. या कार्यासाठी जमा केलेल्या रक्कमेतून खरेदीचा खर्च भागविण्यात येईल व खर्च भागवून उर्वरीत रक्कम ज्या-त्या जिल्हा परिषदांना जमा करण्यात येईल. ही प्रक्रिया व वाटप तीन आठवड्यामध्ये पूर्ण करावे, असेही जिल्हा परिषदांना कळविण्यात आल्याचे सांगत यासंबंधीचा विभागाचा शासन निर्णय व आरोग्य मंत्रालय यांचे शासन निर्णय जिल्हा परिषदांना आवश्यक कार्यवाहीस्तव पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमियोपॅथीक अर्सेनिक अल्बम औषध चांगली कामगिरी करते असे आयुष मंत्रालयाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे हे औषध खरेदी करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानेही घेतला होता. केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक सर्व विभागांच्या अखर्चित निधीची माहिती घेण्याचे काम सूरू केले होते. ग्रामविकास विभागाने तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या रक्कमेवरील व्याज या निधीमधून राज्याच्या पातळीवरून ग्रामीण भागातील ५ कोटी लोकांना वितरणासाठी विभागाने अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीची निविदा काढली होती. परंतु, ज्या दरामध्ये औषधे मिळणे आवश्यक होते तो उद्देश सफल होऊ शकला नाही. त्यामुळे ही खरेदी प्रक्रीया रद्द करण्यात आली. आता यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

 508 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.