परीक्षा रद्द केल्यामुळे परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत करा

सरकारने फी वसूली करुन विद्यार्थ्यांचा छळ करू नये

भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांची मागणी

मुंबई : एकीकडे सरकारने परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली असली तरी मुंबई विद्यापीठाने मात्र विद्यार्थ्यांकडून परिक्षा फी वसूली सुरू ठेवली असून ती तात्काळ थांबवा. उलट परीक्षा रद्द झाल्या मग विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत द्या, अशी मागणी भाजपा नेते माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी आज कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्राद्वारे केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या मात्र परीक्षा शुल्क मात्र विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहे. मुंबई विद्यापीठाने सर्व कॉलेजना याबाबतचे आदेश निर्गमित केले असून कॉलेजने जमा केलेली फी विद्यापीठाकडे जमा करावी असे निर्देश दिले आहेत. सरकारकडून विद्यार्थ्यांची छळवणूक सुरु आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचे उघड करत आमदार अँड आशिष शेलार यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी जर परीक्षा रद्द झाल्या तर परीक्षांची फी विद्यार्थ्यांकडून का घेताय ? उलट प्रवेशाच्या वेळी ही परीक्षा फी जर कॉलेजने घेतली असेल तर ती आता विद्यार्थ्यांना परत करा, अशी मागणी केली आहे.

*काँग्रेसला पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही*

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनूसार तेलाचे भाव आपल्या देशातील तेलाचे भाव ठरवण्याचा निर्णय मागील काँग्रेस सरकारच्या काळात झाला. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव जसे वाढतात तसे आपल्या देशातील भाव वाढत आहेत. ही बाब आम्ही नम्रपणे जनतेपर्यंत पोहोचत आहोत. काँग्रेसच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे आता काँग्रेसला या भाव वाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ते केवळ राजकारण करीत आहेत. जर त्यांना जनतेची एवढीच काळजी असेल तर मग महाराष्ट्र मध्ये पेट्रोल डिझेलवर आकारलेला कर त्यांनी माफ करावा. त्यांनी कर लावल्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महाग झाले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

*मंत्रालयाचे सचिवालय झाले*

सुरुवातीला सिमटर्म नसलेल्या कोरोना रुग्णांच्या चाचण्या केल्या नाहीत नंतर चाचण्यांची संख्याच कमी केली. मुंबई-ठाण्यात प्रत्यक्ष रुग्णांची आकडेवारी व मृतांची आकडेवारी लपवली. हे सगळे करून कोरोना कमी झाला नाही त्यामुळे आता आपण काहीतरी करतोय, हे दाखवण्यासाठी पुन्हा अधिकारी बदलले. दुर्देवाने या राज्यात राजकीय नेतृत्व निर्णय घेत नाहीत. निर्णय सगळे अधिकारी घेत आहेत, आणि म्हणूनच आम्ही मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झाले असे म्हटले, अशी प्रतिक्रिया माध्यमांनी विचारलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

*मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर दिलासा ऐवजी खुलासे करायची वेळ आली*

आज ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईकरांचा खोळंबा झाल्याचे हे चित्र पाहता खरेतर अनलॉक दोनकडे जाताना मुख्यमंत्र्यांनी काल फेसबुक लाइव्ह द्वारे जे भाषण केले. त्यातून काहीतरी दिलासा राज्यातील जनतेला मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी केलेले नियम नियमावली पाहता, प्रत्यक्षात मात्र सरकारला वारंवार खुलासे करायची वेळ येते आहे. हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आमदार आशिष शेलार यांनी दिली

 625 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.