आमदार निरंजन डावखरे यांचा ठाणे महापालिकेला सवाल
ठाणे : ठाण्यातील ग्लोबल हबमध्ये उभारलेले १ हजार बेडचे विशेष कोविड रुग्णालय अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. त्यातच मुंब्रा व खारेगाव येथील प्रत्येकी ४०० बेडच्या रुग्णालयांपाठोपाठ व्होल्टास कंपनीच्या जागेवर आणखी १ हजार बेडचे रुग्णालय उभारण्याची घोषणा झाली आहे. ग्लोबल हबमधील रुग्णालयासाठी स्टाफ मिळालेला नाही. मग आणखी हॉस्पीटले उभारून ठाणे महापालिकेला विक्रम करायचा आहे का, असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी `ट्वीटर’द्वारे केला आहे. आधी हॉस्पीटलसाठी आवश्यक स्टाफची नियुक्ती करूनच कोविडसाठी नवी विशेष हॉस्पीटल उभारावीत, अशी सुचनाही आमदार डावखरे यांनी केली आहे.
ग्लोबल इम्पॅक्ट हबमधील हॉस्पीटलात पुरेसे डॉक्टर, नर्सेससह वैद्यकिय सेवेतील कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे आयसीयूसह हॉस्पीटल पूर्ण क्षमतेने सुरू करता आलेले नाही. त्यातच महापालिकेने म्हाडामार्फत मुंब्रा येथे ४०६ व खारेगाव येथे ४३० बेडचे हॉस्पीटल उभारण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. त्याचबरोबर पोखरण रोड नं. २ येथील व्होल्टास कंपनीच्या जागेवरही सिडकोमार्फत १ हजार बेडचे हॉस्पीटल उभारण्याची घोषणा झाली. महापालिकेच्या एकाच हॉस्पीटलसाठी पुरेसा स्टाफ मिळालेला नाही. आता नव्या हॉस्पीटलांसाठी महापालिकेनेच जाहिरात दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतरच हॉस्पीटल सुरू करायला हवीत, असे मत व्यक्त करीत आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यातील कोविड रुग्णांची खरंच सेवा करायचीयं, कि महापालिकेला हॉस्पीटल उभारण्याचा विक्रम करायचांय, असा सवाल केला आहे. हॉस्पीटलसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत कोणीही बोलत नसल्याकडे निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले आहे.
893 total views, 2 views today