विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा राज्य सरकार- महापालिकेवर आरोप
ठाणे : कोरोनाच्या ठाणे शहरासह जिल्ह्यात वाढलेला प्रार्दूभाव रोखण्यास राज्य सरकार व महापालिका जबाबदार आहेत. दोन्ही यंत्रणामध्ये समन्वयाचा अभाव असून, प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अनेक मृत्यू घडले आहेत. बेड, ऑक्सिजन आणि अॅम्ब्यूलन्स नसल्यामुळे झालेल्या मृत्यूला प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केला.
`कोरोना’मुळे निर्माण झालेल्या ठाणे शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज दौरा केला. भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन सेंटर, माजिवडा येथील ग्लोबल हॉस्पीटलला भेट दिल्यानंतर, त्यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याबरोबर बैठक घेतली. या वेळी आमदार संजय केळकर, आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, भाजपाचे गटनेते संजय वाघुले, नगरसेवक मिलिंद पाटणकर, नारायण पवार, मनोहर डुंबरे, सुनेश जोशी, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.
ठाणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यात सरकार व महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली, दोन्ही यंत्रणात समन्वय नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत. त्यात प्रशासनाचा बेजबाबदारपणा व आरोग्य व्यवस्थेतील हेळसांडपणाही कारणीभूत आहेत. अनेक ठिकाणी बेड, ऑक्सिजन आणि अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे मृत्यू झाले. त्याला प्रशासनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
ठाणे महापालिकेने चांगल्या पद्धतीने हॉस्पीटल उभारले. त्यात बेडबरोबरच सुंदर डेकोरेशन केले आहे. मात्र, डॉक्टर व नर्स उपलब्ध नसल्यामुळे हॉस्पीटलचा उपयोग काय. ३०० ते ३५० नर्सची आवश्यकता असताना, केवळ ६० ते ७० नर्सच्या साह्याने हॉस्पीटल कसे सुरू राहणार, असा सवाल करीत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हॉस्पीटलसाठी तत्काळ मनुष्यबळ उपलब्ध करण्याची मागणी केली. त्यासाठी राज्य सरकार व महापालिकेवर भाजपाच्या वतीने दबाव टाकण्यात येईल, असे ते म्हणाले.
एकीकडे जितो ट्रस्ट सेवा म्हणून हॉस्पीटल चालविण्याचे सांगत आहे. मात्र, त्यांचे सल्लागार ५ लाख रुपये मानधन मागत असेल, तर हा सेवाभावनेला डाग लागेल. डॉक्टर व नर्स वाजवी मानधन मिळाले पाहिजेच. पण जितो ट्रस्टच्या सेवेच्या माध्यमामागे काही लपले आहे का, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला. त्याचबरोबर डॉक्टर व नर्स यांना मानधनवाढ देण्याचे आयुक्तांनी मान्य केले असल्याचे नमूद केले. सिव्हील हॉस्पीटलमध्ये केवळ १५ ते २० व्हेंटिलेटर आहेत. या ठिकाणी ५० ते ६० व्हेंटिलेटरची गरज आहे, याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
…तर रस्त्यावर आंदोलन करणार
ठाणे शहरातील परिस्थिती आठ दिवसांत आटोक्यात न आल्यास भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. अवाजवी बिले आकारून लूट करणाऱ्या हॉस्पीटलांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा कारभार सुधारावा, ५५ वर्षांवरील शिक्षकांना नियुक्त्या देऊ नयेत, जवाहरबाग स्मशानभूमीबरोबरच अन्य चार स्मशानभूमीत मृतदेहांचे दहन करावे, पुरेशा ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करावी, कोरोनाशी लढा देण्यासाठी आवश्यक औषधांची खरेदी करावी आदी १२ मागण्या भाजपाच्या वतीने करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी केली.
एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा
बदल्यांमधून प्रयत्न : प्रवीण दरेकर
कोरोनावर आयुक्तांची बदली हा उपाय नाही. नव्या आयुक्तांना समजून घेण्यास दोन महिने लागतात. सध्याची परिस्थिती हीच आहे. अशा पद्धतीने शिपायांच्या बदल्याही होत नाहीत. त्यामुळे या बदल्यांमागे गौडबंगाल असावे. नगरविकास मंत्र्यांच्या माध्यमातून आलेल्या आयुक्तांची बदलीमागे मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निशाना साधला जातोय का, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. नव्या आयुक्तांनी दोन दिवसांत माहिती घेऊन काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांची काही दिवसांतच राज्य सरकारने बदली करू नये, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला. महापालिकेच्या आयुक्तांना कोरोनाबद्दल जबाबदार धरले जात असेल, तर तेथील सत्ताप्रमुखांना का नको, असा सवालही त्यांनी केला.
418 total views, 1 views today