ठाण्यातील आशा वर्कर्सना मिळणार ९ हजार रुपये मानधन

पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री व महापौर यांच्या बैठकीनंतर महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचा निर्णय

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोवीड १९ साठी काम करणाऱ्या आशा वर्कर्सना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात आली असून यापुढे प्रत्येक दिवशी तीनशे रूपये याप्रमाणे महिन्याला अंदाजे नऊ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश गणपत म्हस्के आणि इतर पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या महिलांना देण्यात येणारे मानधन वाढविण्यात यावे यासाठी काही दिवसांपूर्वी राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश म्हस्के आणि महापालिकेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत आशा वर्कर्सचे मानधन वाढविण्यात यावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी त्यांच्या मानधनात वाढ करुन त्यांना प्रतिदिनी ३०० रूपये याप्रमाणे महिन्याला अंदाजे ९ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या कामात आशा वर्कर्स या देखील रुग्णांसाठी तत्परतेने कार्य करीत आहेत, त्यामानाने त्यांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असून त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी असा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

 456 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.