निकृष्ट जेवणामुळे कोविड डॉक्टरांना डिसेंट्री


 
 महापालिकेच्या कंत्राटदारावर कारवाई करण्यासाठी पनवेल संघर्ष समिती सरसावली
 
 पनवेल : पनवेल उपजिल्हा कोविड-१९ रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि रूग्णांना पुरविण्यात येणारे जेवण अतिशय सुमार दर्जाचे असल्याने तेथील डॉक्टरांना डिसेंट्रीचा त्रास झाला आहे. याला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर त्वरीत कारवाई करून त्याच्याकडील कंत्राट रद्द करावे, अशी महत्वपूर्ण मागणी पनवेल संघर्ष समितीने आज, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
 महापालिकेने अधिगृहित केलेल्या कोविड उपजिल्हा रूग्णालयात अनेक समस्यांचा सामना करत तेथील डॉक्टर आणि इतर कर्मचारी कोविड रूग्णांवर उपचार करीत आहेत. याबाबत संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी वारंवार संबंधित अधिकार्‍यांकडे याबाबत सुचनाही केल्या आहेत. गेल्या आठवड़्यात सार्वजनिक आरोग्य खात्याच्या उपसंचालिका गौरी राठोड यांनी रूग्णालयास भेट दिली असता डॉक्टरांच्या जेवणाचा प्रश्‍न पुन्हा समोर आल्याने त्यांनीही याबाबत आयुक्तांना कळविले असून अजूनही त्याप्रकरणी महापालिकेने लक्ष दिलेले नाही.
 त्या पत्राचा संदर्भ घेवून कांतीलाल कडू यांनी हे प्रकरणच चव्हाट्यावर आणले आहे. त्याच्याविरूद्ध तात्काळ कारवाई करून सकस, पोषक आहार न पुरवला गेल्यास महापालिकेविरूद्ध आंदोलन छेडण्याचा तसेच न्यायालयात याचिका दाखल करण्याचा लेखी इशाराच कडू यांनी दिला आहे.
 कोविड रूग्णालयातील एक्स-रे यंत्रणा बिघडली तर कोविड रूग्णांची एक्स रे द्वारे तपासणी करण्यास अडचण होऊ शकते, त्यामुळे तिथे वातानुकुलीत यंत्रणा बसविण्यात यावी. तसेच कोविड सेवेतील डॉक्टरांना विश्रांती मिळावी, म्हणून तिथे नव्या डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात यावी, अशा महत्वाच्या मागण्यांचे निवेदन आज, शनिवारी (ता. २०) देशमुख यांना पाठविण्यात आले आहे.

 536 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.