मराठी माध्यमांच्या शाळांना ‘रोटरी’चा मदतीचा हात

तीन शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत

अंबरनाथ : मराठी माध्यमाच्या शाळा सध्या आर्थिक संकटात आहेत. वर्ग अनुदानीत असले तरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाव्यतिरिक्त कोणताही निधी शासन शाळांना देत नाही. विना अनुदानीत तुकड्यांचा तर सर्व खर्च संस्था चालकांना सोसावा लागतो. त्यामुळे इमारत देखभाल, दैनंदिन स्वच्छता, वीज, पाणी बिल आदी खर्च कुठून भागवायचे असा पेच या शाळांपुढे आहे. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथने शहरातील तीन मराठी शाळांमध्ये सौर वीज प्रकल्प बसवून मराठी शाळांना मदत करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाचे औपचारिक उद््घाटन मंगळवार, २३ जून रोजी शिवाजी आबाजी कोळकर विद्याालयात सकाळी ११ वाजता होणार आहे.
वडवली-शिवाजीनगर येथील शिवाजी आबाजी कोळकर विद्याालय, साई विभागातील भगिनी मंडळ शाळा आणि कानसई विभागातील बालविकास मंदीर प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येकी तीन किलोवॅट क्षमतेचे सौरप्रकल्प ‘रोटरी’ने बसवून दिले आहेत. ‘करोना’ संकटामुळे सध्या शाळा बंद आहेत. मात्र जेव्हा कधी शाळा सुरू होतील, तेव्हा येथील विद्याार्थी सौरदिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करू शकतील. या प्रकल्पांमुळे या तिन्ही शाळांच्या वीजबिलात प्रत्येकी चार हजार रूपयांची बचत होईल, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष दीपक रेवणकर यांनी दिली. दीपक रेवणकर ठाणे जिल्ह््यातील एक नामांकित सौरऊर्जा प्रकल्प उद्योजक असून देश विदेशात त्यांनी नाविन्यपूर्ण आणि भव्य सौरऊर्जा प्रकल्प साकारले आहेत. त्यांच्याच देखरेखीखाली शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.
या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे सहा लाख रूपये इतका असून त्यातील दोन लाख रूपये रोटरी क्लबने दिले आहेत. उर्वरित रक्कम विविध कंपन्यांनी त्यांच्या ‘सीएसआर’मधून दिली. त्यात अपार इंडस्ट्रीज, हिरालाल नानावटी चॅरिटेबल ट्रस्ट, पटेल रिटेल चॅरिटेबल ट्रस्ट, सुमा केमिकल, तुलसी इन्फ्राटेक, आनंद इन्व्र्हर्टर, एस्कॉट बॅटरी या कंपन्यांनी या प्रकल्पास हातभार लावला आहे.

आरोग्य सेवकांसाठी पीपीई कीट

रोटरीच्या वतीने अंबरनाथ येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयातील आरोग्य सेवकांसाठी पीपीई कीट देण्यात येणार आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयांसाठी ६८० पीपीई कीट देण्यात येत असल्याचे रोटरी क्लबच्या वतीने सांगण्यात आले.

 469 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.