व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकित मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांचे निर्देश
ठाणे : पावसाळ्यात जलजन्य आणि किटकजन्य आजारांचा होणार प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने पाण्याची नमुना तपासणी करणे, प्रत्येक आरोग्य केंद्रावर मुबलक औषधसाठा उपलब्ध करणे, ग्रामपंचायत मार्फत गावात निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य व यंत्रणेला सज्ज राहण्याची सुचना त्यांनी केली.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी आज सर्व विभागाचे विभागप्रमुख , तसेच तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी आणि इतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम , स्वच्छ भारत मिशन, आदी विभागाच्या आढाव्यासह कोरोनाच्या सध्यस्थितीचाही आढावा त्यांनी घेतला.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी खबरदारीच्या उपाययोजना केला जात आहेत.आता कोरोनाच्या संकटासह पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला सर्व यंत्रणासह सतर्क राहण्याचे निर्देश सोनवणे यांनी दिले.
कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने कोव्हिडं केअर सेंटर आणि कॉरंटाईन सेंटर उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवश्यक असणारे कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत असेही त्यांनी आरोग्य विभागाला सूचना केल्या. तसेच कोव्हिडच्या काळात कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी दिली. जे कर्मचारी नेमून दिलेल्या दिवशी किंवा आठवड्यातून एक दिवस तरी कार्यालयात उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात यावी असेही संबंधित विभागाला निर्देशित केले.
533 total views, 1 views today