नवदाम्पत्यांचा सामाजिक संस्थांना आहेर

बालकाश्रमातील मुलांना पंगतीचा पहिला मान : अविस्मरणीय रणीय विवाह सोहळा

बदलापूर : कोरोना संचार बंदीने अनेक रूढी, परंपरा, प्रथा बदलल्या. लग्नसोहळा म्हणजे खरंतर आनंदाचा अविस्मरणीय पण कौटुंबिक सोहळा. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र येऊन हा सोहळा आनंदात धुमधडाक्यात साजरा करण्यात येत असे. कोरोनाच्या संचार बंदीमुळे या सोहळ्यावर अनेक बंधने आली आहेत. बदलापुर मधील एका इंजिनियर नवदांपत्याने सामाजिक बांधिलकी जपून लग्न सोहळ्याचा जणू नवीन पायंडाच पाडून दिला आहे. लग्नाच्या अवास्तव खर्चाला कात्री लावून वाचलेल्या निधीतून सामाजिक संस्थांना मदतीचा हात दिला. खरे तर नवदांपत्यांना समाजाकडून आहेर दिला जातो मात्र बदलापूर मधील इंजिनियर असलेल्या या नवदाम्पत्याने समाजातील संस्थानाच आहेर दिला आहे. ज्यांच्यावर निसर्गाने अन्याय केला आहे अशा विशेष मुलांना, मुक्या प्राण्यांना, अनाथ मुलांना आणि कोरोना योध्यांना आपल्या लग्न सोहळ्याच्या आनंदात सहभागी करून घेतले.
रविवारी १४ जून रोजी बदलापुर पश्चिमेकडील सोनिवली येथे असलेल्या सत्कर्म बालकाश्रमाच्या सभागृहामध्ये बदलापूरातील प्राची शिर्के आणि उल्हासनगर मधील स्वप्नील देवकर यांचा छोटेखानी लग्नसोहळा मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत साजरा झाला. खरेतर हा सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचा या कुटुंबीयांचा विचार व नियोजन होते. मात्र कोरोनाच्या संचार बंदीमुळे त्यांनी विचार बदलला.
अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या सत्कर्म बालकाश्रमाला मदतीचा हात देता यावा यासाठी या बालकाश्रमाच्या हॉलमध्ये या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विवाह झाल्यावर स्नेहभोजनही याच हॉलमध्ये झाले. खरेतर विवाहात पहिल्या पंगतीचा मान हा नवऱ्या मुलाकडील पाहुण्यांचा असतो मात्र येथे हा पहिल्या पंगतीचा मान या रिवाजाला मुरड घालून सत्कर्म बालकाश्रमात राहणाऱ्या मुलांना देण्यात आला.
या लग्नसोहळ्यात जेवणावळीसह जेमतेम २५ ते ३० हजार रुपये खर्च आला. त्यामुळे या नवदांपत्याने लग्नासाठी होणाऱ्या खर्चातून सुमारे ७० हजार रुपये सामाजिक कार्यासाठी खर्च केले आहेत. ज्यांच्यावर निसर्गाने अन्याय केला आहे अशा विशेष मुलांसाठी काम करणारी ‘संगोपिता’, मुक्या प्राण्यांसाठी काम करणारी ‘पाणवठा’, गरजूंना अन्नधान्याची मदत करण्यासाठी झटणारे मार्शल नाडर, रामदासी सेवाश्रम, समृद्धी निसर्ग जीवन संस्था व शांतिनिकेतन विचारमंच या संस्थांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत या नवदांपत्यांकडुन देण्यात आली आहे. बदलापूर मधील कोविड हॉस्पिटलला व बदलापूर पालिकेला प्रत्येकी २० पीपीई किट तसेच सत्कर्म बालकाश्रमाला २१ हजार रुपयांची मदत या इंजिनियर दांपत्यांतर्फे देण्यात आली आहे.
मुंबई येथील बेस्टमध्ये नोकरीला असलेले स्वप्नीलचे वडील अनिल देवकर यांनी त्यांचे मित्र नितीन कांबळे यांना सामाजिक बांधिलकी जपत मुलाचा लग्नसोहळा करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी देवकर यांच्यासह माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. अनाथ मुलांना मदतीचा हात मिळावा या उद्देशाने सत्कर्म बालकाश्रमात हा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला. संभाजी शिंदे यांच्यासह ऍड. प्रदीप पाटील, पाणवठा संस्थेचे गणराज जैन, सत्कर्म बालकाश्रमाचे पेशणे सर आदींसह मोजकेच कुटुंबीय या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. देवकर व शिर्के कुटुंबीयांनी साजरा केलेल्या या सामाजिक बांधिलकी जपत संपन्न झालेल्या या लग्नसोहळ्याची ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या नवदांपत्याच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वप्नील व प्राची यांचे सुमारे १००० मित्रमैत्रिणी या लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यातील अनेकांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. ते सर्वजण त्यांना आहेर पाठवणार आहेत. हे नवदांपत्य आहेरातून मिळणारी रक्कमही सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत म्हणून देणार आहेत.
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील उच्चशिक्षित स्वप्नील व प्राची तसेच त्यांच्या कुटुंबियांनी लग्न सोहळ्याच्या खर्चातून सामाजिक संस्थांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. लग्नाचा आहेरही ते सामाजिक संस्थांना मदत देणार आहेत. हे सगळं कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय सुद्धा असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे माजी शहर अध्यक्ष आणि अभियंता संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

 434 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.