’राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ लाखो ठाणेकरांपर्यंत पोहचणार – आनंद परांजपे

पक्षाचे धोरण ठरवण्यासाठी सामान्य कार्यकर्त्याकडून सूचना मागवणार

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब यांनी यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजितपवार, खा. सुप्रिया सुळे आणि ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ’राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ अभियानाला २२ मे रोजी सुरुवात झाली आहे. या अभियानाला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या अभिप्राय नोंदणीचा शेवटचा टप्पा आज,१५ जूनपासून सुरु झाला असून या टप्प्यात लाखो ठाणेकरांपर्यंत पोहचण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मनोदय आहे, अशी माहिती ठाणे शहराध्यक्ष, माजी खासदार आनंद परांजपे यांनी दिली.
आनंद परांजपे यांनी सांगितले की, गेल्या २१ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या यशस्वी कामगिरीचा वर्धापनदिनानिमित्ताने मी आढावा घेत आहे. या दोन दशकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार वेळा राज्यात सत्ता स्थापन केली. तसेच, स्थापनेनंतर अवघ्या ८ महिन्यात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला आहे. हा देखील शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाचा एक विक्रमच आहे.
या १० जून रोजी स्थापनेपासून २१ वर्ष पूर्ण केले. सध्या राज्य आणि देश कोरोनरुपी संकटातून जात असल्याने खा. शरदचंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना, वर्धापन दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा आणि हे संपूर्ण वर्ष लोकसेवेसाठी अर्पण करावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा भासत असल्याने राष्ट्रवादीने ठाणे शहरात रास्त दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. तसेच, ठाण्यातून आपल्या मूळगावी जाणार्‍या मजुरांनाही अन्नधान्याचे वाटप केले आहे.
वर्धापन दिनाच्या अनुषंगाने शरदचंद्र पवार यांंनी बूथ समित्या तयार व कार्यान्वित करण्याची मोहीम जिल्हा पातळीवर हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, प्रदेश चिटणीस सुहास देसाई, माजी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या सहकार्यातून तसेच सर्व विधानसभाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष यांच्या माध्यमातून ठाण्यात ही मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमेद्वारे ८0000 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. एकूणच ठाणे शहरातील उच्चभ्रू वस्त्यांपासून झोपडपट्ट्यांपर्यंत पोहचण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पोहचण्यात यश आले आहे. या मोहिमेला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, ’राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ या मोहिमेचा शेवटचा टप्पा आजपासून सुरु झाला असून या टप्प्यात ज्यांनी या पक्षाच्या उभारणीस योगदान दिले आहे अशा प्रत्येकाचे म्हणणे जाणून घेण्यात येणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते, बूथ कमिटीचे कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी यांच्याकडून पक्षाच्या उन्नतीसाठी करावयाच्या सुचना ऑनलाइन पद्धतीने सूचना मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी पक्षाने करावयाच्या उपाययोजना, पक्षवाढीसाठी आखावयाच्या योजना, नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षा आदी सूचनाही नोंदविण्यात येणार आहे. अशा पद्धतीने पक्षाची ‘पॉलिसी’ ठरविण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न देशाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

 335 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.