एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पात आरोग्यकेंद्र उभारणार

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भविष्यात वैद्यकीय सुविधांची वानवा भासू नये, यासाठी एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये १ हजार ते ५ हजार चौरस फुटाचे आरोय केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
म्हाडा, एसआरए योजनांच्या वास्तूंमध्ये सर्वसामान्यांची आरोग्य व्यवस्था राबविण्यासाठी, आरोग्याशी संबधित पायाभूत यंत्रणा उभारण्यासाठी, परिणामकारण उपचारांसाठी कृतीकार्यक्रम तयार करण्याचे आदेश या आधीच डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. तसेच, गृहनिर्माण खात्याच्या वतीने स्वतंत्र क्वारंटाईन यंत्रणाही सुसज्ज केली आहे. ठाणे शहरातील मुंब्रा आणि कळवा येथे कोविड रुग्णालयही विकसीत केले आहे.
आता भविष्यात रुग्णालयांची कमतरता भासू नये, हा दूरदृष्टी विचाराने प्रेरीत होऊन डॉ. आव्हाड यांनी, फ्री ऑफ एफएसआय या तत्वावर झोपडीधारकांसाठी प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये १ हजार ते ५ हजार चौरस फुटांचे रुग्णालय उभारण्याचे आदेश दिले आहेत. ही आरोग्य केंद्रे उभी राहिल्याने झोपडपट्टीतील नागरिकांना ते रहात असलेल्या ठिकाणीच चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. तसेच, येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पामध्ये एक बालवाडी, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय आणि मनोरंजन केंद्रही फ्री ऑफ एफएसआय या तत्वावर सुरु करण्याचे आदेश डॉ. आव्हाड यांनी दिले आहे.

 402 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.