ग्रामीण भागात कोरोनाचे २६७ रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले

*

नागरिकांनी पावसाळ्यात विशेष काळजी घ्या – हिरालाल सोनवणे

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत २६७ कोरोना रुग्ण या महामारीवर मात करून स्वगृही परतले आहेत.सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २४९ कोरोना रुग्णावर उपचार सुरु आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता, स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. आता पावसाला सुरु होत असून स्वत:च्या आरोग्याची विशेष काळजी घ्या असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण बरे होत आहेत हि सुखद बातमी  आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण देखिल चांगले आहे. आरोग्य प्रशासन सुयोग्यरित्या परिस्थिती हाताळत आहे. ग्रामीण भागातील नागरिक देखिल प्रशासन वेळोवेळी करत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करत आहेत. जिल्ह्यातील मुरबाड तालुका प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी सुयोग्य नियोजन केलेले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

उर्वरित तालुक्यात देखिल आरोग्य विभागा अंतर्गत नियमित सर्वेक्षण सुरु आहे. प्रतिबंधित क्षेत्रात कडक अमलबजावणी करण्यात येत आहे. आजच्याघडीला ७६  प्रतिबंधित क्षेत्र कार्यरत असून १ हजार १९८ पथकाच्या माध्यमातून आतापर्यंत  १ लाख २० हजार ५०३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. शिवाय प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत औषध फवारणी, नालेसफाईची कामे, निर्जंतुकीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य यंत्रणा काम करत आहे. ग्रामीण भागातील कोरोना रूग्णासाठी विविध भागात क्वारंटाईन सेंटर आणि कोरोना केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे.  यामध्ये टाटा आमंत्रा कल्याण बायपास, बीएसयुपी सोनिवली बदलापूर, सिद्धार्थ कॉलनी ( खडवली ) कुडवली ( मुरबाड ) जोंधळे कॉलेज ( आसनगाव ) शेटे कॉलेज ( कसारा ) आदि  ठिकाणी क्वारंटाईन सेंटर आहेत. तर प्रेसिडेन्सी इंग्लिश हायस्कूल एलकुंदे भिवंडी, भिनार आश्रमशाळा, जोंधळे कॉलेज, नारायण स्कूल वरप, बीएसयुपी सोनिवली , काचकोळी आश्रमशाळा, एनटीई इंजिनियरिंग कॉलेज आदी ठिकाणी कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आलेले आहे. सध्याच्या घडीला घरी अलगीकरण केलेले १०३९  लोक असून अलगीकरण कक्षात भरती केलेले ४७४  लोक आहेत.

 416 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.