चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या शाळांच्या दुरुस्तीस विशेष निधी द्या

भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांची मागणी

ठाणे : निसर्ग' चक्रीवादळाचा कोकणातील शाळांच्या इमारतींना फटका बसला असून, इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. त्याचबरोबर खाजगी अनुदानित शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून खर्च करण्यास राज्य सरकारकडे परवानगी देण्याची मागणीही केली आहे. निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकणातील शैक्षणिक संस्थांना मोठा फटका बसला. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळांवरील कौले व पत्रे उडाली. त्याचबरोबर शाळांच्या इमारतींचेही मोठे नुकसान झाले. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी शाळांचे जोरदार वाऱ्यामुळे नुकसान झाले. या परिस्थितीत किमान गणेशोत्सवापर्यंत शाळा सुरू होणार नसल्याचा अंदाज आहे. नुकसान झालेल्या इमारतींच्या दुरुस्तीनंतरच शाळा पुन्हा भरविता येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सरकारी शाळांबरोबरच खाजगी अनुदानित व खाजगी विनाअनुदानित शाळांचेही नुकसान झाले. त्यात विनाअनुदानित तत्वावर शिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थिती वाईट आहे. खासदार निधीमधून खाजगी अनुदानित शाळांसाठी दुरुस्तीची कामे हाती घेता येतात. मात्र, आमदार निधीसाठी तशी तरतूद नाही. तरी `निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून खाजगी अनुदानित शाळांच्या दुरुस्तीसाठी आमदार निधी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी पत्रात केली आहे.

 582 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.