हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त ‘ऑनलाईन’ विशेष संवादात श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांचे प्रतिपादन
मुंबई : मोगलांच्या अत्याचाराने जनता पिडली जात होती, महिलांवर अत्याचार होत होते. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयातच सामान्य जनता, कष्टकरी, शेतकरी यांना संघटित करून त्यांचे सैन्य निर्माण केले. त्यांच्यात देव, देश अन् धर्म रक्षणासाठी स्वाभिमान निर्माण केला. त्यातूनच पुढे तानाजी, सूर्याजी यांच्यासारखे शूरवीर घडले. चातुर्य अन् कौशल्याच्या बळावर त्यांनी हिंदूंचे राष्ट्र स्थापन केले. आज आपल्यालाही त्याच नीतीचे अनुसरण करावे लागणार आहे; कारण आज कट्टरपंथीय जिहादी, ख्रिस्ती मिशनरी, राष्ट्रविरोधी कम्युनिस्ट आणि भ्रष्टाचारी यांचे भारतावर आक्रमण चालू आहे. त्याला एकच उत्तर आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग, शिवछत्रपतींच्या नीतीचे अनुसरण करून देशाला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी आपल्या सर्वांना संघटित व्हावे लागणार आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त ६ जूनला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदु राष्ट्र’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होेते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‘सुदर्शन न्यूज’चे अध्यक्ष आणि मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ चारुदत्त पिंगळे आणि समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनीही उपस्थित दर्शकांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या आरंभी सनातन संस्थेचे पू. रमानंद गौडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील रहाण्याची शपथ घेतली. हिंदु जनजागृती समितीचे सुमित सागवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमांतून थेट प्रक्षेपित करण्यात आलेला हा कार्यक्रम ४२ हजार लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर १ लाख ७ हजार लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला.
छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलरवादी’ नाही, तर हिंदु धर्मरक्षकच – डॉ.चारुदत्त पिंगळे
वैयक्तिक जीवनात छत्रपती शिवाजी महाराज धर्मपरायण होते, तसेच त्यांचा राजधर्मही सनातन हिंदु धर्माच्या मूल्यांवर आधारित होता. ते ‘सेक्युलरवादी’ नाही, तर हिंदु धर्मरक्षक होते. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा वैदिक पद्धतीने पार पडला. काशीच्या ब्राह्मणांकडून राज्याभिषेक, अष्टप्रधान मंडळाची रचना, संस्कृतमध्ये राजमुद्रा, परकीय शब्द हटवण्यासाठी राजव्यवहारकोष, श्री रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेणे आदी कृती ‘सेक्युलर’ विचारसरणीचा राजा कधी करेल का ? छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु साम्राज्याचे सम्राट आणि हिंदु धर्मरक्षक होते, हेच यातून सिद्ध होते, असे प्रतिपादन समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ.चारुदत्त पिंगळे यांनी केले.
हिंदूंवर अन्याय करणार्या राज्यघटनेतील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी लढा द्या – सुरेश चव्हाणके
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; पण स्वातंत्र्योत्तर काळात महाराजांना अपेक्षित असे राष्ट्र बनवण्यामध्ये आपण खूप कमी पडलो. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदु राष्ट्र या संकल्पनेला सोडून दिले गेले. त्यामुळे आज देशभरात अनेक ठिकाणी धर्मांधांकडून हिंदूंवर अत्याचार होत आहेत, अनेक ‘मिनी पाकिस्ताने’ निर्माण झाली आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित नाही. जेव्हा देशात हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व यांनी भारलेले वातावरण निर्माण होते, तेव्हा हिंदुविरोधी लोकप्रतिनिधींनाही ‘हिंदु कार्ड’ खेळावे लागते. हे लक्षात घेऊन हिंदूंवर अन्याय करणार्या राज्यघटनेतील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी जनमताचा रेटा निर्माण करणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘सुदर्शन न्यूज’चे संस्थापक-संपादक . सुरेश चव्हाणके यांनी केले.
सिनेमा, मालिका यांत शिवरायांच्या सैन्यात बरेच मुसलमान असल्याचे दाखवून विकृतीकरण – रमेश शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुसलमान होते, असे वारंवार बिंबवून महाराजांना ‘सेक्युलर’वादी ठरवले जात आहे. मग या तर्काने औरंगजेबाच्या सैन्यातही हिंदु सरदार होते; म्हणून औरंगजेबाला ‘सेक्युलर’ ठरवणार का ? स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी २७ ऑगस्ट १६८० या दिवशी दिलेल्या दानपत्रात शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’ असा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे बंधू व्यंकोजीराजेंना सप्टेंबर १६७७ मध्ये लिहिलेल्या पत्रात त्यांच्या सैन्यात मुसलमान सैनिकांचा भरणा केल्याविषयी विचारणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मांतर करणार्या गोव्यातील पाद्य्रांचा शिरच्छेद केला. बळजोरीने मुसलमान बनवलेल्या नेताजी पालकर आणि अन्य धर्मांतरितांचे पुन्हा शुद्धीकरण करून त्यांना हिंदु धर्मात सामावून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज हे खर्या अर्थाने हिंदु राजे असतांना सध्या मालिका, चित्रपट यांमधूनही शिवचरित्रातील प्रसंग दाखवतांना मुसलमानांचे उदात्तीकरण केले जाते. हा विकृत इतिहास थोपवण्याची आवश्यकता आहे, असे शिंदे यांनी म्हटले.
583 total views, 3 views today