धुंडिराज पुरुषोत्तम कुलकर्णी यांचे निधन

हवाई दलातून दुसऱ्या महायुद्धात झाले होते सहभागी

अंबरनाथ : ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष धुंडिराज कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई , नातवंडे असा परिवार आहे.
धुंडिराज कुलकर्णी याना धुं. पु., डि. पी. कुलकर्णी अथवा नाना या नावाने ओळखत होते. विशेष म्हणजे धुंडिराज कुलकर्णी, त्यांचे प्रभाकर आणि रामचंद्र हे दोघे भाऊ असे तिघेही हवाई दलात सेवा बजावून निवृत्त झाले होते. तिन्ही भाऊ सैन्यात सेवा बजावून निवृत्त झालेले क्वचित उदाहरण पहावयास मिळते. हवाई दलातून निवृत्त झाल्यावर त्यांनी टपाल खात्यात बावीस वर्षे सेवा केली. त्यानंतर भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर येथे नोकरी केली. टाटा ऍटोमिक पॉवर स्टेशन मधून ते निवृत्त झाले. हवाई दलात असतांना दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. धुंडिराज हे अंबरनाथ मधील ज्येष्ठ नागरिक संघ, ब्राह्मण सभा, सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, नागरिक सेवा मंडळ, सूर्योदय को ऑप क्रेडिट सोसायटी आदी अनेक सामाजिक संस्थांशी निगडित होते. मागील पाच वर्षे त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. युवकांमध्ये रक्तदानाचे महत्व कळावे, रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने ते आपला वाढदिवस रक्तदान शिबीर भरवून साजरा करीत असत.
कोरोनाच्या पर्शवभूमीवर त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही म्हणून त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यांना रात्री अचानक त्रास होऊ लागला तसे त्यांना अंबरनाथ येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना दाखल करून न घेता मुंबई येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्याप्रमाणे त्यांना बी ए आर सी च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात प्रथम कोविड ची चाचणी करण्यात आली. आणि त्याचा अहवाल आल्यानंतर अन्य उपचार करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनानाने घेतला. कोविड चा अहवाल येई पर्यंत धुंडिराज कुलकर्णी यांचे निधन झाले होते. त्यांना स्वतंत्र विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले असते तर कदाचित त्यांना जीवदान मिळाले असते. मात्र तसे झाले नाही असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यांचे वय झाले होते हे मान्य आहे. मात्र रुग्णालयात नेल्यावर प्रथम कोविड ची चाचणी घेण्यात येते मगच अन्य उपचार करण्यात येतात हे चुकीचे आहे. या बाबत आपण पंतप्रधान कार्यालय,वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन आणि पंतप्रधानांकडे ट्विटरच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले असल्याचे त्यांचे चिरंजीव श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले. आमचे वडील आम्हाला सोडून गेले मात्र अन्य रुग्णांवर अशी वेळ येऊ नये हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

 412 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.