विरारवासियांकडून ९१० बाटल्या रक्तदान

रक्तदात्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त, दिव्यांगांनीही दिला प्रतिसाद

विरार : विरारमधील नागरिकांनी मुंबईतील रक्तपेढ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तीन शिबिरांमधून तब्बल ९१० बाटल्या रक्तदान केले. विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात महिलांचे प्रमाण अधिक होते. त्याचप्रमाणे दिव्यांगांनी शिबिरात सहभागी होत रक्तदान केले.
रुग्ण शुश्रुषेत आवश्यक असणाऱ्या रक्ताची मे आणि जून महिन्यात नेहमीच कमतरता जाणवते. त्यामुळे याकाळात नेहमीच मुंबईतील रक्तपेढ्यांकडून रक्तदानाचे आवाहन केले जात असते. मुंबईतील रुग्णसेवेत मोठे योगदान असणाºया नाना पालकर स्मृती रुग्णालयाचे व्यवस्थापक कृष्णा महाडिक याच हेतूने सध्या रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात व्यस्त आहेत. विरारमधील काही परिचितांकरवी आमदार हितेंद्र ठाकुर यांच्याकडे त्यांनी रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. एका शिबिराऐवजी ८ मे, १५ मे आणि २२ मे अशा तीन दिवशी विरारमध्ये निरनिराळया ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. यंगस्टार ट्रस्ट, आजीव पाटील आणि त्यांच्या सहकऱ्यांनी काटेकोर नियोजन केले. व्हॉटस् अ‍ॅप आणि इतर समाज माध्यमाद्वारे या उपक्रमाविषयी माहिती शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यात आली. खरेतर मे महिना, त्यात करोनाचे संकट यामुळे रक्तदान शिबिराच्या दृष्टीने अतिशय प्रतिकुल परिस्थिती होती. मात्र आयोजकांनी मनापासून केलेली मेहनत आणि नागरिकांच्या प्रतिसादाने ही तिन्ही शिबिरे यशस्वी झाली. त्यामुळे मुंबईतील जे.जे. केईएम, नायर आणि टाटा या सर्व प्रमुख रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांना ऐन गरजेच्या वेळी रक्त मिळाले.
आगाशी येथील सेंट पीटर्स स्कुल, नारंगी क्रिकेट मैदान याठिकाणी रक्तदान शिबिरे पार पडली. पहिल्या टप्प्यात २०५ जणांनी रक्तदान केले. दुसऱ्या शिबिरात ४६६ बाटल्या तर तिसऱ्या शिबिरात २३९ बाटल्या रक्त संकलीत झाल्याची माहिती नाना पालकर स्मृती रुग्णालयाचे व्यवस्थापक कृष्णा महाडिक यांनी दिली.

 552 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.