वाहतूक व्यवस्थेअभावी जांभळांची कोंडी


संचारबंदीमुळे गुणकारी फळ वाया जाणार

अंबरनाथ : संचारबंदीमुळे वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने यंदा स्थानिक आदिवासींनी त्यांना हक्काने चार पैसे मिळवून देणाऱ्या जांभूळ आणि करवंदे विक्रीच्या व्यवसायाकडे पाठ फिरवली असून त्यामुळे अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या जांभळांनी यंदा दराच्या बाबतीत आंब्यालाही मागे टाकले आहे.
करोना संचारबंदीच्या काळात काश्मीरची सफरचंदे, नाशिकची द्राक्षे आणि कोकणातील हापूसचे आंबे आदी सर्व फळे आणि भाजीपाला मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. मात्र तुलनेने शहरांच्या अधिक जवळ असूनही जांभूळ आणि करवंद ही फळे मात्र लॉकडाऊनच्या कचाट्यात सापडली आहेत. नैसर्गिकरित्या उगविणारी ही फळे शंभर टक्के सेंद्रीय आणि गुणकारी असली तरी बाजारपेठेत अद्यााप त्यांना मानाचे स्थान मिळालेले नाही. गावपाड्यांवरच्या आदिवासी महिला शहरातील बाजारपेठेतील रस्त्यांलगत पळसाच्या पानांवर ठेवलेल्या वाट्यांद्वारे या फळांची विक्री करताना दिसतात. मात्र यंदा सार्वजनिक वाहतूक साधनांचा अभाव आणि बाजारपेठेतील वेळेच्या मर्यादा यामुळे बहुतेक आदिवासींनी जांभूळ विक्रीकडे दुर्लक्ष केले आहे. मुंबई-ठाणे परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात रेल्वे स्थानकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जांभळे आणि करवंदे विकली जातात. रेल्वे स्थानकातून ये-जा करणारे प्रवासी सहज उपलब्ध असलेला हा रानमेवा खरेदी करतात. यंदा मात्र खरेदी आणि विक्रीची ही साखळीच खंडीत झाली. त्यामुळे हे औषधी फळ शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचू शकले नाही.

जांभळाला २५० रुपये प्रती किलोला भाव

अंबरनाथ तालुका हा पूर्वापार जांभळाच्या पिकांसाठी प्रसिद्ध. याच तालुक्यात जांभूळ आणि जांभिवली नावाची दोन गावेही आहेत. येथील बदलापूरच्या बाजारात मिळणाऱ्या जांभळाची कीर्ती थेट मुंबईपर्यंत पोहोचली आहे. मात्र गेल्या काही वर्षात झपाट्याने होत असलेले नागरीकरण आणि झालेली वृक्षतोड यामुळे बाजारातील जांभळांचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. यंदा संचारबंदीमुळे तर फारच कमी प्रमाणात जांभळे येत असून त्यामुळे दराच्या बाबतीत त्यांनी यंदा आंब्यालाही मागे टाकले आहे. सर्वसाधारणपणे स्थानिक बाजारपेठेत हापूस, केसर आदी जातीचे आंबे शंभर ते दीडशे रूपये किलो दराने विकले जातात. मात्र यंदा जांभळाचा दर २५० रूपये किलो इतका चढा आहे.

 547 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.