मुंब्र्यातील तीन रुग्णालयांवर गुन्हा दाखल

रुग्णालयात दाखल करुन न घेणाऱ्या तसेच भरमसाठ
पैसे उकळल्याचा आरोप

ठाणे : मुंब्रा परिसरात कोविड १९ चे रुग्ण वाढत असताना अशा रुग्णांना रुग्णालयात जागा नाही असे सांगून दाखल करुन न घेणाऱ्या, तसेच गरीब आजारी लोकांना व प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांकडून भरमसाठ पैसे सांगणाऱ्या मुंब्र्यातील बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेयर रुग्णालय व युनिव्हर्सल रुग्णालयाबाबत महापालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा प्रभाग समिती मधील बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेयर रुग्णालय व युनिव्हर्सल रुग्णालयामध्ये गरीब व आजारी रुग्णांना दाखल करताना, तसेच महिलांना प्रसुतीसाठी दाखल करताना भरमसाठ पैसे भरा असे सांगितले जात होते, तसेच रुग्णालयात बेड शिल्लक असताना देखील प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. सध्या कोविड १९ चे रुग्ण वाढत असताना रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करुन घेण्याबाबत रुग्णालयांना विनंती करण्यात आली होती तसेच नोटीसही बजावण्यात आली होती. परंतु गेल्या दोन दिवसात प्राप्त झालेल्या तक्रारीची पडताळणी करुन त्यात तथ्य असल्याचे आढळल्यानंतर या रुग्णालयांवर गुन्हा दाखल करण्याचे व सिल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.

त्यानुसार आयुक्त विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेअर रुग्णालय आणि युनिव्हर्सल रुग्णालय विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, तसेच प्राईप व क्रिटीकेअर या रुग्णालयातील रिक्त रुम महापालिकेच्या वतीने सिल करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी, कार्यालयीन अधीक्षक बाळू पिचड, लिपिक जितेंद्र साबळे, नैनेश भालेराव यांनी केली.

 458 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.