“लढवय्ये” ६ महिन्यातली ठाकरे सरकारची मिळकत

परत येईन… परत येईन म्हणणाऱ्या भाजपाचा दावा फोल ठरला

मुंबई : राज्यात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात औट घटकेचे फडणवीस सरकार जावून नवे ठाकरे अर्थात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापनपन्न झाले. त्यास आज बरोबर ६ महिने पूर्ण होत असून या ६ महिन्यापैकी जवळपास तीन महिने कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यात जात असल्याने याचा अपवाद वगळता सरकारला फारसं काही करता आलेले नसलं तरी या कालावधीत लढवय्य सरकार म्हणून बिरूद मिळवलं.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्यावर ठाकरे घराणे म्हणून राज्यातील प्रेम करणाऱ्यांनी आणि न करणाऱ्यांनी त्यांच्याकडे थोडंस आश्चर्याने आणि विश्वासाने पाहिले. त्यांच्या बोलण्यातील शैलीमुळे कधी नव्हे ते राज्याच्या राजकारणातील व्यक्ती आपल्यातलाच वाटायला लागला. त्यामुळे कळत नकळत त्यांच्याकडून लोकांच्या फार नसल्यातरी माफक अपेक्षा निर्माण झाल्या. त्यातच त्यांना कधीही संसदीय राजकारणाचा आणि प्रशासकिय कामाचा अनुभव नसल्याने ते कसा राज्य कारभार हाकतात याकडे शिवसैनिकांबरोबरच विरोधकांचे लक्ष लागून राहील्याचे चित्र सर्वांनाच पाह्यला मिळाले.
याच कालावधीत भाजपाकडून हे सरकार आता कोसळणार, मग कोसळणार अशी सातत्याने राजकिय व्यक्तव्य करण्यात येत होती. त्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तर कधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चढाओढच लागली होती. परंतु त्यांनी सांगितलेले मुहुर्त, तारखा या सगळ्या जावून या सरकारला सहा महिने पूर्ण झाल्याने भाजपाच्या दावा फोल ठरला. दरम्यान भाजपाने केलेल्या राजकिय कुरघोड्यांमुळे भाजपा सत्तेसाठी अधिर झाल्याचे चित्र निर्माण झाले.
मागील ६ महिन्यातील उध्दव ठाकरे यांची कामगिरी पाह्यची झाल्यास त्यांनी झुकणा-भाकर केंद्राच्या धर्तीवर राज्यात १० रू रूपयात शिवभोजन ताळी सुरू केली. तसेच राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आंतरराष्ट्रीयस्तरावर नेण्यासाठी म्हणून लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय सुरु करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत १५२ नव्या मोठ्या आजारांचा समावेश करून सर्वसामान्य जनतेला त्याचे फायदे कसे मिळतील यादृष्टीने आखणी केली.
या सरकारला अडीच महिने पूर्ण होत नाहीत. तोच कोरोना आजाराने राज्याच्या दरवाज्यावर टकटक आवाज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तर या आजाराने जबरदस्तीने राज्यात घुसखोरी करून जो काही खेळ मांडला तो आपण सर्वजण पहातच आहोत. परंतु या आजाराने आपल्या राज्यात घुसखोरी करून फारच उपद्वाप करून ठेवू नये यासाठी सर्वात आधी पंजाब, ओरीसा पाठोपाठ लॉकडाऊन जाहीर केला. तसेच परदेशी पर्यटकांकडून या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पाहून राज्यात येणारी परदेशी प्रवाशांना घेवून येणारी विमाने बंद करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली. मात्र केंद्राने स्वत:च्या मुडी स्वभावाननुसार त्यास आठवड्याभराचा कालावधी घेतला.
तरीही न डगमगता, राज्यातील जनतेला दिलासा देत प्रत्येक लॉकडाऊनच्या घोषणेवेळी आणि नंतरही स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लोकांशी संवाद साधत त्यांना कोरोनावर मात करणार असल्याची ग्वाही देत जनतेला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आतापर्यतच्या संवादात त्यांच्या बोलण्यातील त्रागा, कटूता ही कधीच दिसून आली नाही. उलट त्यांच्या संवाद साधण्याच्या कलेमुळे राज्यातील सर्वसमान्य जनतेमध्ये एकप्रकारचा कोरोनाविरोधातील आत्मविश्वासच निर्माण झाला. भलेही कोरोनाग्रस्त रूग्णाच्या संख्या वाढल्या तरी.
या लॉकडाऊनमुळे राज्यातील वित्तीय महसूल जवळपास बंद झालेला असताही प्रशासन आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत जनतेला तोषिस न होवू देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सरकारच्या विरोधात उठणाऱ्या प्रत्येक अफवांचे योग्य भाषेत खंडन करून संबधिताना मधाळ भाषेत समजही दिली. कोरोना संकटावरून विरोधकांना राजकारण करण्याची मुभा देत स्वत: मात्र राजकारण करणार नसल्याचे जाहीर करणारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अपवाद असतील. त्यांच्या आतापर्यतच्या राज्य कारभार हाकण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच भाषेत सांगायच झालं तर महाराष्ट्र हा लढवय्यांचा देश आहे, त्यामुळे त्यांच सरकारही लढवय्यच ठरत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष: म्हणजे त्यांच्या सरकारला ६ महिने पूर्ण होत असताना त्याची एकही जाहीरात किंवा ओळ कोणत्याही प्रसारमाध्यमात अद्याप तरी दिसत नाही किंवा त्याचा इव्हेंट आयोजित केल्याची माहिती अद्याप तरी ऐकण्यात नाही.

 461 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.