स्पीक अप इंडिया’ मोहिमेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची माहिती

मुंबई : कोरोना विषाणुच्या संकटामुळे सर्वात जास्त अडचणीत सापडलेल्या गरीब, कामगार, स्थलांतरीत मजूर, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाने देशव्यापी चालवलेल्या ऑनलाईन मोहीम ‘स्पीक अप इंडिया’ला महाराष्ट्रातही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारपर्यंत या समाजघटकांचा आवाज नक्कीच पोहचला असून झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने आतातरी जागे व्हावे आणि या घटकांना मदत करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत चालवलेल्या या ऑनलाईन मोहिमेत राज्यातील मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, पक्ष पदाधिकारी, जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने ट्विटर, फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्रामवरून या मोहिमेत सहभाग घेतला. गरिबांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करावेत व पुढील सहा महिने प्रतिमहा ७५०० रुपये द्यावेत, स्थलांतरीत मजुरांना सुखरुप घरी पोहचवण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक मदत द्यावी तसेच मनरेगातर्फे २०० दिवसांचा रोजगार द्यावा या मागण्या या स्पीक अप इंडिया कॅम्पेनच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
देश सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून लॉकडाऊनमुळे कामगार, गरिब, हातावर पोट असलेले, शेतकरी, लघु उद्योजक यांना मोठ्या कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. या राष्ट्रीय संकटात केंद्र सरकारने सढळ हस्ते मदत करुन पीडित घटकांना आधार देण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणूनच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसने ‘स्पीक अप इंडिया’ ऑनलाईन मोहीम राबवली. सामान्य जनतेचा हा आवाज केंद्र सरकारचे कान नक्की उघडेल असे ते म्हणाले.
‘स्पीक अप इंडिया’ या ऑनलाईन मोहिमेत सहभाग घेऊन ही मोहिम यशस्वी केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

 624 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.