संख्या वाढणार…पण अनेक गोष्टी पूर्वपदावर आणणार

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे इशारा आणि आश्वासन

मुंबई : केंद्रीय पथकाने काही दिवसांपूर्वी मे अखेर पर्यत १ लाख २५ हजार ते दिड लाख रूग्णाच्या संख्येचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आज मे महिन्याची २४ तारीख असून सद्यपरिस्थितीत ही संख्या ३३ हजार आहे. ही संख्या केवळ आपल्यामुळेच नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे सांगत आगामी दिवसात संख्या आणखी वाढणार असल्याचा इशारा देत परंतु आपण कोरोनासोबत जगण्याच्या सवयीचा भाग म्हणून अनेक गोष्टी पूर्वपदावर आणत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले.
लॉडाऊनच्या ४ थ्या टप्प्यात समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधताना ते आज बोलत होते.
मागील काही दिवस राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. काल ४७ हजार संख्या झाल्याचे ऐकले, वाचले असेल. मात्र प्रत्यक्षात ३३ हजार रूग्णच राज्यात असल्याचे स्पष्ट करत आपण १ ला रूग्ण आजही यादीत ग्रहीत धरतो. त्यामुळे ही संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. या कालावधीत १५ जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद गोष्ट आहे. हे मृत्यू व्हायला नको होते. मात्र अनेक रूग्ण हे आजाराच्या शेवटच्या टप्प्यात येत असल्याने या गोष्टी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यपरिस्थितीत ७ ते ८ हजार बेड्स आपण उपलब्ध केलेले आहेत. ते पुढील महिन्यापर्यंत त्यात आणखी वाढ करून १३ ते १५ हजारापर्यत आपण बेड्स उपलब्ध करणार आहोत. त्यामुळे जरी संख्या वाढलेली असली तरी त्या सर्वांना उपचार मिळणे सोपे होईल. पावसाळा येत असल्याने सर्वांना अतिरिक्त काळजी घ्यावी लागणार असल्याचे सांगत उकळलेले पाणी घ्या, स्वच्छता राखा सारखे सल्लेही त्यांनी यावेळी दिले.
आता आपल्याला फारकाळ असे रहावे लागू नये यादृष्टीकोनातून राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात विचार सुरु आहे. त्याचबरोबर अंतिम सत्राच्या राहीलेल्या परिक्षाही घेण्याचा विचार करत असल्याचे सांगत आजस्थितीला राज्यातील ७० हजार उद्योगांना त्यांचे कामकाज सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ५० हजार कारखाने, उद्योग सुरु झालेले असून त्यात ६ लाख कामगार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय अनेक गोष्टी आपल्याला सुरु करायच्या आहेत. मात्र तुम्ही सर्वांनी गर्दी न होण्याचे भान राखायचे आहे. शाररीक अंतर, तोंडाला मास्क लावणे, हात सतत सॅनिटायर्सने धुणे आदी गोष्टी सातत्याने आपल्याला सातत्याने कराव्या लागणार असल्याने कोरोना आपल्यासोबत असेल नसेल याचा विचार करू नका. मात्र आपल्याला काही काळ या गोष्टी कराव्या लागणार आहेत. जरी तुम्ही गर्दी कराल तर दिलेल्या सुविधा पुन्हा बंद केल्या जातील. त्यामुळे त्याचे भाग बाळगा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 347 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.