महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेला ठाणे पालिकेचा हरताळ

कोरोनावर मोफत उपचाराबाबत रुग्णालयांत संभ्रम

आरक्षित बेडची यादी जाहीर करा, मनसेची प्रशासनाकडे मागणी

ठाणे : ठाण्यातील हजाराहून अधिक रूग्ण करोनाच्या आजाराशी संघर्ष करत आहेत. त्याचबरोबर रूग्णालयातील महागडे उपचार घेणे आता अनेकांना परवडत नसल्याचे पुढे येत आहे. मुळात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत नमूद केलेल्या रुग्णालयांमध्ये हे उपचार मोफत करण्याची तरतूद असतानाही या योजने अंतर्गत असलेले खासगी रूग्णालय मात्र रूग्णांची लूट करत आहे. ठाणे महापालिका परिसरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत करोना आजारावर मोफत उपचार देणाऱ्या रूग्णालयातील बेडची यादी जाहीर करण्याची मागणी मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत (केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारक)महाराष्ट्रातील ८५ टक्के लोकं या योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहे. तर ठाण्यातील वेदांत हॉस्पिटल, काळसेकर हॉस्पीटल,होरीझोन हॉस्पिटल आणि बेथनी हॉस्पिटल ही रूग्णालय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत येत असल्याचे सरकारनेही त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केले आहे. पण आज याच रूग्णालयात रूग्णांना लाखो रूपये घालून करोना आजारावर उपचार घ्यावे लागत आहेत. दरम्यान या संदर्भात मनसेने राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी चर्चा केली असता केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांना या योजने अंतर्गत असलेल्या खासगी रूग्णालयात करोना आजारावर मोफत उपचार केले जात असल्याचे स्पष्ट केले.

ठाणे महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांसाठी जाहीर केलेल्या दर पत्रकामध्ये याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य या योजने अंतर्गत पिवळा व केशरी रेशन कार्ड धारकांना या योजने अंतर्गत असलेल्या खासगी रुग्णालयात उपचार मोफत असल्याचेही प्रशासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. हे उपचार मोफत असतानाही नागरिकांना कोणत्या रूग्णालयात मोफत उपचार दिले जात आहेत, त्यासाठी किती बेड या योजने अंतर्गत राखीव ठेवण्यात आले आहेत याची माहिती ठाणेकरांना द्यावी. तसेच कोणत्या रूग्णालयात मोफत उपचार केले जातील, रूग्णालयाचे दरपत्रक ठाणे महापालिकेने डीजी ठाणे अँपवर प्रकाशित करण्याची मागणी मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी केली आहे.

 482 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.