शिवभक्त आमदार संजय केळकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे धाव
ठाणे: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांवर देखभाल करणारे २४९ कर्मचारी कामावरुन तडकाफडकी कमी करण्यात आले आहेत. भाजपाचे आमदार, सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिवभक्त संजय केळकर यांनी संबंधित केंद्रीय मंत्र्यांकडे धाव घेत या अन्यायाला वाचा फोडली आहे.
केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मुंबई परिक्षेत्रांतर्गत रायगड, अलिबाग, विजयदुर्ग, वसई, मुंबईसह राज्यातील ११ उप मंडळात अनेक शिवकालीन गड- किल्ले, मंदिरे आणि पुरातन वास्तुंचा समावेश होतो. या वास्तुंची देखभाल करण्यासाठी ३७० कर्मचारी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा करित होते. मात्र अचानक यापैकी २४९ कर्मचारी आणि कामगारांना अधिक्षक डॉ.राजेंद्र यादव यांनी १ मे २०२० पासून कामावरुन कमी केले आहे. विशेष म्हणजे या कर्मचारी वर्गाची देणी प्रलंबित असताना आणि ऐन लॉकडाऊनच्या काळात कामावरुन कमी करुन अन्याय केला आहे. केंद्राचे अशा स्वरुपाचे कोणतेही धोरण आणि निर्देश नसताना .यादव यांनी मनमानीपणे ही कारवाई केली आहे. या आधीही यादव यांनी मनमानी कारभार केला असल्याची तक्रार आ.संजय केळकर यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे केली आहे. या कर्मचारीवर्गास पुन्हा तातडीने कामावर घेऊन त्यांची प्रलंबित देणीही तातडीने अदा करण्यात यावीत, अशी मागणीही आ.संजय केळकर यांनी केली आहे.
आ.संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महाराष्ट्रात असा अन्याय शिवभक्त होवू देणार नाहीत, असे सांगितले. अधिक्षक राजेंद्र यादव हे नेहमीच मनमानी कारभार करत आले आहेत. त्यांच्याबाबत अनेक तक्रारी शिवभक्तांनी माझ्याकडे केल्या आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गेली अनेक वर्षे शिवकालीन गड-किल्ले यांच्या संवर्धनासाठी लोकसहभागातून चळवळ सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून हे गड-किल्ले शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहेत. याचे संवर्धन होणे ही काळाची गरज असताना या ऐतिहासिक वास्तूंची देखभाल करणारे कर्मचारी आणि कामगार यांनाच कामावरुन कमी केले जात आहे. याबाबत पुरातत्व विभागाशी पाठपुरावा सुरु असून हा अन्याय दूर केला जाईल, असे आ. केळकर यांनी सांगितले.
1,201 total views, 1 views today