डमी उमेदवार रमेश कराड झाले आमदार
मुंबई : सत्तेत असताना खोट्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला आणि विधानसभे पाठोपाठ परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या नेत्यांविरोधात टिकेची तोफ डागली. मात्र त्यांच्या तोफ डागण्यामुळे पंकजा मुंडे यांच्या गटाचे रमेश कराड यांच्या गळ्यात अचानक अधिकृत उमेदवारीची माळ पडून ते बिनविरोध निवडून आले. त्यामुळे खडसेंच्या नाराजीचा फायदा पंकजा गटाला झाल्याची चर्चा भाजपामध्ये सुरु झाली.
साधारणत: दोन वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाण्यासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक रमेश कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देत निवडूण आणण्यासाठी चंग बांधला. मात्र आयत्यावेळी रमेश कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारत थेट पंकजा मुंडे यांचे नेतृत्वात भाजपात सामील झाले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना चांगल्याच नामुष्कीला सामोरे जावे लागले होते.
त्यातच नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. या पराभवासाठी भाजपाच्या एका बड्या नेत्याने धंनजय मुंडे यांना मदत केल्याची चर्चा राज्यभर सुरु होती. त्यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी राज्यातील त्या बड्या नेत्याच्या विरोधात रान उठवायला सुरूवात केली. त्याचवेळी एकनाथ खडसे यांच्याकडून नाराजीचा सुर मोठ्या प्रमाणावर आळवला जात होता. त्यामुळे काही काही काळापुरते मुंडे, खडसे एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु पुन्हा काही दिवस जाताच खडसेंनी आपली टीकेची धार कायम सुरु ठेवली मात्र त्या नाराजांच्या आघाडीतून पंकजा मुंडे या गायब झाल्या.
विधान परिषद निवडणूकीकरीता भाजपाकडून गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहीते-पाटील, डॉ. अजित गोपचडे आणि प्रविण दटके यांना अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरायला लावला. तर डमी उमेदवार म्हणून रमेश कराड आणि संदीप लेले यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र पुन्हा आपल्याला उमेदवारी नाकारल्याने खडसे यांनी नेहमीच्या शैलीत पक्षनेत्यांच्या विरोधात टीकेची झोड उठविली. नेमक्या याच संधीची वाट पहात बसलेल्या भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी रमेश कराड यांच्या उमेदवारीला अधिकृत करत डॉ.अजित गोपचडे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली. त्यामुळे मुंडे गटाचा एक आमदार विधान परिषदेवर निवडूण गेला. त्यामुळे पंकजा मुंडे यांना दिलासा देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी केल्याचे पक्षात बोलले जात आहे.
474 total views, 1 views today