आक्रमक कौशल्यच खो-खोचा खरा आत्मा – डॉ. संजय मुंडे

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आयोजित ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा

परभणी : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन व श्री शिवाजी महाविद्यालय परभणी यांच्या वतीने ५ ते १३ मे दरम्यान ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज खो-खो खेळातील आक्रमक कौशल्य याविषयी परभणी येथील एन. आय. एस. कोच डॉ. संजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले.

आजच्या सत्रात सुरवातीला महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निबाळकर यांनी ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेचे कौतुक केले. गेले चार दिवस या कार्यशाळेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून ते भारावून गेल्याचे संगितले. तसेच फक्त भारतातूनच नव्हे तर भारताबाहेरून सुध्दा काही शिबिरार्थी या कार्यशाळेत सहभागी होत असल्याचे कळल्याने ते आनंदी असल्याचे संगितले. महाराष्ट्र नेहमीच खो-खोला एक वेगळी दिशा देत असल्याचेही त्यांनी संगितले.

एन. आय. एस. कोच डॉ. संजय मुंडे यांनी खेळाडूंची आक्रमक कौशल्यच खो-खोचा खरा आत्मा असल्याचे संगितले. खरतर त्यांनी नियमोल्लंघन न करता साधा खो कसा द्यावा ते खेळाडूत आक्रमकपणा कसा बाणवा यासंबंधी बरेच मार्गदर्शन केल. खुंट कसा मारावा, सरळ जाऊन स्कंद रेषा न हलवता खेळाडूच्या दिशेने कसे जावे व त्यावर आक्रमण करावे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.

या खेळात असलेले विलक्षण चापल्य, वेगवान निर्णय, साहसी झेप किंवा अप्रतिमरीत्या स्तंभात मारणे, खेळाडूंच्या हुलकावण्या यामुळे कमीत कमी वेळेत सामना रोमहर्षक ठरत असतो. खो खोतील हे चापल्य व अतिशय वेगवान, क्षणाक्षणाला उत्कंठा व निर्णय क्षमता वाढवणारा हा खेळ प्रेक्षकांना नेहमीच मैदानावर खिळून ठेवतो. खो-खो हा वेगवान, साहसी खेळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ही ऑनलाइन कार्यशाळा अतिशय उत्तम रित्या पार पडावी यासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. संतोष कोकिळ, डॉ. संतोष सावंत, डॉ. सुनील मोडक, सुशील इंगोले व पवन पाटील आदि परिश्रम घेत आहेत.

 437 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.