राज्यांतर्गत मजुरांसाठी विशेष रेल्वे-बससेवा द्या

.

इंटकचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे यांची शासनाकडे मागणी

ठाणे : जालना येथे मालगाडीने दिलेल्या धडकेत १६ मजुर जागीच ठार झाले. ही अतिशय दूर्दैवी घटना आहे. त्यामुळे पराराज्यातील मजुरांप्रमाणेच महाराष्ट्रात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मूळगावी जाण्यासाठी मजुर-कामगारांसाठी विशेष रेल्वे-बससेवा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी इंटकचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मजुर-कामगार त्यांच्या मूळगावी विशेष रेल्वेने स्थलांतर करित आहेत. परंतु आपल्याच राज्यातील ग्रामीण भागातून पोटापाण्यासाठी मुंबई, ठाणे आदींसह इतर भागात नोकरीसाठी आलेल्या मजूर-चाकरमान्यांचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. हे मजूरही त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी आतुर झालेले आहेत. परंतु त्यांच्यासाठी शासनाने काहीच व्यवस्था केलेली नाही,अशी खंत इंटकचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील या मजूर-कामगारांना वाहतुकीचे साधन नसल्याने ते उन्हातान्हात उपाशीपोटी,अनवाणी आणि संकटांशी सामना करत शेकडो किमी पायपीट करत आहेत.यात जालनासारख्या घटना घडत आहेत, लहान-सहान अपघातही होत आहेत. या नागरिकांचीही जबाबदारी राज्य शासनाने घ्यायला हवी.या मजूर-कामगारांसाठी पनवेल,ठाणे किंवा दिवा येथून विशेष ट्रेन सोडता येईल का? याचा विचार व्हावा,असेही सचिन शिंदे यांनी म्हटले आहे. रेल्वेसेवा शक्य नसल्यास विशेष एसटीच्या बसेस सुरु करुन त्यांना आपापल्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करुन दिल्यास ते ही सुखरुप गावी जातील. सध्या नाशिक,कोकण, सांगली,सातारा किंवा राज्यातील इतर भागात जाण्यासाठी मुंबई, ठाण्यातून अनेकांचे लोंढे आता पायी चालू लागले आहेत,यात त्यांचे हाल होत आहेत.याची दखल घेऊन शासनाने त्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी सचिन शिंदे यांनी केली आहे.

 454 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.