अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी काढले आदेश


कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेप्रमाणे मुंबईतील चाकरमान्यांना प्रवेश बंदी

मुंबई : ज्या मुंबई शहरात मिळणाऱ्या रोजगाराच्या जीवावर मुंबईच्या आजूबाजूला शहरे वसली आता त्याच लहान-मोठ्या शहरांकडून उपनगरातून मुंबईमध्ये कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्याचे सत्र सुरु केले. काल कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांनी अशा आशयाचे पत्रक काढल्यानंतर आता अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी असे पत्रक काढत ८ मे पासून परतणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
काल मंगळवारी यांसदर्भातील कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेने पत्रक काढल्यानंतर सर्वचस्थरातून टीकेची झोड उठली. त्यामुळे अखेर या दोन्ही महानगरपालिकांनी पत्रक मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र आता बदलापूर आणि अंबरनाथ या दोन नगरपालिकांनी अशा आशयाचे पत्रक काढले. त्यामुळे या भागातून शासकिय आणि मुंबई महानगरपालिका आणि
खासगी आस्थापना, बँक कर्मचाऱ्यांसमोर कामावर जावे कि न जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी प्रशासनाकडून राहण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. परंतु याच उपनगरीय भागातून शासकिय कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकार, खाजगी आस्थापना, बँका आदींनी अद्याप राहण्याची व्यवस्था पुरविण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु मुंबईतून काम करून येणारा कर्मचारी, अधिकाऱ्याकडून या परिसरात कोरोना विषाणूची लागण होत असल्याचा एक समज या उपनगरात पसरत चालला असल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अशा पध्दतीची बंदी घालण्याची पत्रके काढण्यात येत असल्याचे अंबरनाथ नगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

 347 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.