इरफान , तुम्हारी याद बहोत आएगी!!-अजय निक्ते

इरफान , अत्यंत हरहुन्नरी , जबरदस्त ताकदीचा नट आपल्यातून जाऊन आज एक आठवडा झाला. २०१६ मध्येच इरफान ने आपल्या नावातून खान हा शब्द काढून टाकला होता. इरफान ,एवढेच नाव तो लावायचा..आठवड्या मागून आठवडे जातील पण इरफान ला विसरणे फिल्म इंडस्ट्रीलाच नव्हे तर रसिकांना ही शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

इरफान ला स्पोर्ट्स मध्ये प्रचंड रस होता , तो एक उत्तम क्रिकेटपटू होता. पतंगबाजी हा त्याचा खास शौक होता. सेटवर नसला तर इतरवेळी अत्यंत साधेपणाने तो वावरायचा. मात्र समाजात कुठे काय घडतेय , काय सुरू आहे यावर त्याचे बारीक लक्ष असायचे, त्याबाबत तो फार सजग होता.
बोलके डोळे , नैसर्गिक अभिनय, रोल ला साजेशी देहबोली , सहज आणि वेगळी अशी संवादफेकीची शैली ही त्याची वैशिष्ठे होती.
एन एस डी ,मधून पासआऊट झाल्यावर , ज्या काळात दूरदर्शन वर उत्तम आणि गुणी अभिनेत्यांना संधी मिळत होती, त्यावेळी त्यातल्या अनेक कलाकारांपैकी इरफान हा एक होता. त्याच वेळी पंडित नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया , या पुस्तकावर आलेल्या , ‘भारत एक खोज’ , या मालिकेत इरफान ला काम करायची संधी मिळाली. डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘चाणक्य’ मालिकेतील सेनापती भद्रशाह , शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या ‘श्रीकांत’ मधील रुद्र अशा एक एक मालिकेत त्याने आपली छाप पाडायला सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या नीरजा गुलरी यांच्या चंद्रकांता या मालिके ने इरफानला वेगळी ओळख मिळवून दिली. याच काळात एन एस डी मधील सुतापा सिकदार यांच्या बरोबर तो पर्यंत इरफान चे लग्न झाले होते. सितापा यांचे संवाद लेखन असलेली , ‘ बनेगी अपनी बात’ , या मालिके साठी त्याला विचारणा झाली , पण इरफान या कामासाठी उत्सुक नव्हता , मात्र पत्नी सुतापा यांच्या आग्रहाखातर त्याने ऑडिशन दिली , आणि मग याच मालिकेतल्या त्याच्या रोल ने त्याला रवी राय यांच्या ‘स्पर्श’ मध्ये महत्वाचा रोल मिळाला. त्यानंतर आलेल्या स्टार बेस्ट सेलर , ‘ एक शाम की मुलाकात’ मध्ये प्रेक्षकांना एक वेगळाच इरफान बघायला मिळाला..
तो पर्यंत मीरा नायर यांच्या ,’ सलाम बॉम्बे ‘ मध्ये इरफान ने आपल्यातील एका वेगळ्याच अभिनेत्याचा ट्रेलर रसिकांना दाखवला होता. त्यानंतर मात्र इरफान ने कधीच मागे वळून बघितले नाही. राष्ट्रीय पुरस्कारापासून ते फिल्म फेअर पर्यंत असे कुठलेच पुरस्कार मग त्याने शिल्लक ठेवले नाहीत.
बॉलिवूड बरोबरीने इरफान ने आपले स्थान हॉलिवूड मध्येही पक्के आणि दखल घेण्याजोगे केले होते. तीन साडेतीन दशकांपूर्वी जयपूर मधून आलेल्या या सामान्य चेहऱ्याच्या माणसाने दूरदर्शनच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करत , स्वतःची अशी खास जागा या चित्रपटक्षेत्रात बनवली.

अत्यंत मनमोकळ्या स्वभावाचा , उत्तम माणुसकी जपणाऱ्या , नवीन कलाकारांना ऑडिशन पासून ते प्रत्यक्ष शुटिंगवेळी सेटवर मोलाच्या टिप्स देणाऱ्या ,आपलेसे करून त्यांना मदत करणाऱ्या लाडक्या इरफान भाईला विसरणे खरंच अशक्य आहे…..
भाई , आय विल मिस यू……

 579 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.