कोरोनाच्या संकटाही ‘अमृत आहार’ योजना सुरु

आदिवासी क्षेत्रातील ८९६ अंगणवाड्या मार्फत  लाभार्थाच्या घरपोच पोषण आहार

ठाणे :  आदिवासी भागातील लहान मुलं, गरोदर माता आणि स्तनदा माता यांना पूरक आहार मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी केंद्र सरकारची भारतरत्न ए.पी. जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना कोरोनाच्या संकटातही ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात सुरळीत सुरु आहे. आदिवासी क्षेत्रातील ८९६ अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून लाभार्थाना महिनाभराचा एकत्रित कोरडा आहार वाटप केला जात आहे. 

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील सहा वर्षावरील लहान बालक, गरोदर माता, स्तनदा माता यांचे सुयोग्य पोषण होण्यासाठी ही योजना लाभदायी ठरली आहे. जिल्ह्यात मुख्यतः शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यात आदिवासी क्षेत्र आहे. येथील अंगणवाडी मार्फत ही योजना राबवली जाते. एरव्ही या योजनेच्या लाभार्थ्यांना अंगणवाडी शिजवलेले अन्न दिले जाते. मात्र कोरोनामुळे अंगणवाडी केंद्र बंद असल्याने अंगणवाडी सेविका-मदतनीस किंवा बचत गटांच्या मार्फत लाभार्थाच्या घरोघरी जाऊन महिनाभराचा पोषण आहार वाटप करत आहेत. यामध्ये ६ हजार ३०० महिला व ३८ हजार  बालकांचा समावेश आहे.

यामध्ये  गरोदर स्त्रियांना व स्तनदा मातेस एकवेळचा चौरस आहार देण्यात येतो. एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये गहू, तांदूळ, कडधान्य-डाळ, खाद्यतेल, गूळ, साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला याचा समावेश आहे. तसेच अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना अंडी, केळी, स्थानिक फळे असा अतिरिक्त आहार दिला जात आहे.  स्तनदा मातेचे आरोग्य तसेच नवजात बालकाचे वजन व उंची योग्य राहून कुपोषणास प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.

पोषण आहारासाठी सुयोग्य नियोजन
जिल्ह्याच्या आदिवासी भागातील बालमृत्यू व कुपोषण कमी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाद्वारे ही योजना राबवली जात आहे.  अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि गरोदर स्त्रिया, स्तनदा मातांच्या आहारातील उष्मांक आणि प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरु करण्यात आली. त्याचा फायदा लाभार्थ्यांना होत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनातून या कठीण काळातही पोषण आहार सर्व लाभार्थापर्यंत पोहोचत असल्याचे नियोजन केले जात असल्याचे  जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास) संतोष भोसले यांनी सांगितले.

 481 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.