रेशनकार्ड आधार लिंक नसेल तरीही मिळणार धान्य

आमदार गणेश नाईक यांच्या मागणीला यश


नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे नवी मुंबईतील ज्या नागरिकांचे रेशन कार्ड आधार कार्ड बरोबर लिंक नाही त्यांनाही रेशनिंग दुकानांवर अल्पदरात अन्नधान्य मिळणार आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या लोक डाऊन मुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असताना रेशनिंग दुकानांवरील धान्य त्यांच्यासाठी मोठा आधार ठरतो. मात्र रेशनिंग दुकानांवर अन्नधान्य मिळवण्यासाठी रेशनिंग कार्ड आधार लिंक असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शेकडो नागरिकांचे रेशन कार्ड अद्याप आधार लिंक झालेले नाही त्यामुळे या नागरिकांना रेशनिंग दुकानांवर शिधा मिळत नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन आमदार गणेश नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना १५ एप्रिल २०२० रोजी पत्र पाठवून रेशन कार्ड आधार लिंक असो किंवा नसो सर्वांना रेशनिंग पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनानेच आता निर्णय घेतला असून ज्यांचे आधार कार्ड रेशन कार्ड बरोबर लिंक नाही त्यांनाही रेशनिंग दुकानांवर अन्नधान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. शासन निर्णयानुसार अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सध्या रेशनिंग दुकानांवर प्रति मानसी दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू दिला जातो आहे.
तांदूळ ३ रुपये किलो आणि गहू २ रुपये किलो अशा अल्पदरात दिला जातो आहे. केशरी कार्डधारकांसाठी गहू आठ रुपये किलो आणि तांदूळ बारा रुपये किलो ने उपलब्ध आहे
डाळी देखील देण्याचा निर्णय झालेला आहे परंतु अध्याप डाळींचा पुरवठा रेशनिंग दुकानांवर झालेला नाही. डाळींचा पुरवठा लवकरात लवकर करून सर्वसामान्यांना त्याचे वितरण तातडीने करावे अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी केली आहे.
शिधा मिळवण्यासाठी नागरिकांनी त्यांच्यासोबत रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड घेऊन रेशनिंग दुकानावर जायचे आहे अशी माहिती शिधावाटप अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 655 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.