जेष्ठ कबड्डीपटूंनी सुरु केलेल्या या संस्थेने दिले ८१,००० रुपयांचे योगदान
मुंबई : जगभर सुरू असलेल्या “कोरोना” तांडवाचा फटका महाराष्ट्राला देखील बसला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातून सावरण्यासाठी सर्व जनतेला मदतीचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील “ओम् कबड्डी प्रबोधिनी” या कबड्डी क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनेने देखील या करिता आपला खारीचा वाटा उचलला आहे. अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माया मेहेर या प्रबोधिनीच्या अध्यक्षा असून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तारक राऊळ कार्याध्यक्ष, आणि सिताराम साळुंखे उपाध्यक्ष आहेत. एन आय एस प्रशिक्षक जीवन पैलकर हे चिटणीस आहेत. सेवानिवृत्त व सेवानिवृत्तीच्या जवळ आलेल्या माजी कबड्डी खेळाडूंनी ह्या प्रबोधिनीची १७ वर्षांपूर्वी स्थापना केली आहे. हा निधी प्रबोधिनीचे सभासद व हितचिंतक यांच्याकडून जमविण्यात आला.
ओम् कबड्डी प्रबोधिनीचे पदाधिकारी तारक राऊळ, अजय पेंडूरकर, प्रमोद पेंडूरकर, डॉ. शैलेश शेलार, रमेश लांबे यांनी आज ८१,००० /- रुपयांचा धनादेश “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” करिता मुंबईच्या प्रथम नागरिक किशोरी पेडणेकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी प्रबोधिनीचे आभार मानत महापौर किशोरीताई म्हणाल्या की, “ओम् कबड्डी प्रबोधिनी क्रीडा क्षेत्रात तर अग्रेसर असे कार्य करणारी संघटना आहेच, पण आज या प्रबोधीनीने “मुख्यमंत्री सहाय्यता निधीस” आर्थिक मदत करीत आपली सामाजिक बांधिलकी देखील जपली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा देते.”
753 total views, 1 views today