एक दिवसाचे वेतन देणार असल्याचे कर्मचारी मध्यवर्ती महासंघाकडून उपमुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी त्यासंबंधीचे पत्र आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केले.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरुन लढत आहेत. खाजगी व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांही या लढाईत योगदान देत आहेत. ‘मुख्यमंत्री सहायता निधी’च्या माध्यमातून या लढाईसाठी आर्थिक बळ एकत्रित केले जात आहे. या निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक जाणीव, कर्तव्याच्या भावनेतून राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मे २०२० महिन्याच्या वेतनातून या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आदेश काढण्यात यावेत, अशी विनंती कर्मचारी महासंघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याचे ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी आज दिली.
541 total views, 1 views today