मुंबई: ३१ पत्रकारांची करोनावर मात

रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज


मुंबई: राज्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असला तरी, या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही काही प्रमाणात दिलासा देणारी आहे. मुंबईतील ३१ पत्रकारांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांचे चाचणी अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेनं ही माहिती दिली. दरम्यान, या सर्व रुग्णांना १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबईत करोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार होत आहेत. येथील प्रत्येक घटना-घडामोडींची माहिती मुंबईकरांपर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असणाऱ्या विविध माध्यमांमधील पत्रकार आणि कॅमेरामन्सनाही करोना साथीने गाठले. माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेनंतर त्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यातील ३१ पत्रकारांचे चाचणी अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या सर्वांना १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. दरम्यान, शीवमधील प्रतीक्षा नगर येथील प्रेस एन्क्लेव्हमधील दोन पत्रकार करोनावर मात करून घरी परतल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं. या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले होते.

 369 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.