सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य द्या

आधार कार्ड लिंक असण्याची अट शिथिल करण्याची आमदार गणेश नाईक यांची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील सर्व रेशनिंग दुकानांमध्ये सर्व अन्नधान्याचा पुरवठा करणे तसेच शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना देखील अन्नधान्याचे वाटप करावे अशी मागणी आमदार लोकनेते गणेश नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.


देशातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी अन्नधान्याचा पुरवठा करण्याबाबतचा निर्णय
घेतला असून रास्तभाव दुकानांमार्फत हे अन्नधान्य वाटप सुरु आहे. परंतु नवी मुंबई शहरातील बहुतांश रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप संर्पूण धान्याचा पुरवठा झाला नसल्याने अनेक शिधापत्रिका धारकांना त्याचा लाभ मिळाला
नाही. तसेच काही दुकानांमध्ये तांदळाचा पुरवठा झालेला आहे परंतु डाळीचा पुरवठा अद्याप झालेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत तात्काळ संबंधितांना सूचना देऊन नवी मुंबई शहरातील सर्व रास्तभाव दुकानांमध्ये
त्यांना देय असलेला सर्व अन्नधान्य पुरवठा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे.


तसेच नवी मुंबई शहरातील काही नागरिकांचे शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक न केल्याने त्यांना संबंधित रास्तभाव दुकानांमधून धान्य मिळत नसल्याची वस्तुस्थिती आमदार नाईक यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे. आपत्कालिन परिस्थिती पाहता गरीब गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळणे आवश्यक आहे. तरी शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक न केलेल्या शिधापत्रिकाधारकांनाही एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी अन्नधान्याचा मोफत लाभ मिळण्याकरिता संबंधितांना सूचना देऊन योग्य ती तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केलेली आहे.

 659 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.